Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Jalna › इंटरचेंज हलविल्यास गुन्हे दाखल करू : दमानिया

इंटरचेंज हलविल्यास गुन्हे दाखल करू : दमानिया

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:38AMजालना : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात  जालना तालुक्यातील गुंडेवाडी-जामवाडी-आंबेडकरवाडी येथील प्रस्तावित असलेला इंटरचेंज पॉइंट हलविल्यास भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेविका अंजली दमानिया यांनी शेतकरी संघर्ष समितीला दिली. यावेळी या आंदोलनात आपण शेतकर्‍यांसोबत लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी (दि. 19) रोजी दमानिया आल्या होत्या. यावेळी  त्यांची शेतकरी बचाव संघर्ष समितीचे  अध्यक्ष नारायण गजर व सहकार्‍यांनी भेट घेतली, यावेळी त्या बोलत होत्या. दमानिया म्हणाल्या की,  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील नियोजित इंटरचेंज पॉइंट हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शेतकर्‍यांचे नुकसान करून धनदांडग्यांचे हित जोपासणार्‍या प्रवृत्तींचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण शेतकरी संघर्ष समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून याबाबत आपण आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी समितीच्या पदाधिकार्‍यांनी इंटरचेंज पॉइंट हलविण्यासंदर्भात चर्चा केली. गुंडेवाडी, तांदुळवाडी, जामवाडी येथील नियोजित असलेले स्थळ स्थलांतर  करण्याच्या   हालचालींबाबत ग्रामस्थांकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहे.निधोना, खातगाव येथे उद्योगपती, राजकारणी व अधिकार्‍यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे इंटरचेंज पॉइंट तेथे हलविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी सांगितले. यावेळी जमिनीचे दस्ताऐवज दमानिया यांना दाखविण्यात आले.