Sat, Aug 24, 2019 18:58होमपेज › Jalna › सरपणासाठी शेतातील वृक्षांवर कुर्‍हाड

सरपणासाठी शेतातील वृक्षांवर कुर्‍हाड

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:14PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागात सरपणाची समस्या अजूनही कायम आहे. शासनाने गावांना धूरमुक्‍त करण्यासाठी गॅसजोडणी देऊनही सरपणाची समस्या सुटू शकलेली नाही. सरपणाची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे शेतातील वृक्षांवर कुर्‍हाड चालविली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी गोवर्‍यांचा आधार घेतला जातो. अलीकडे शासनाने कुर्‍हाडबंदी लागू करून घरोघरी गॅसजोडणी उपलब्ध करून धूरमुक्त करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. मात्र, काही कारणास्तव अनेकांना अजूनही गॅस जोडणी मिळालेली नाही. शेतकरी शेत परिसरात वृक्षांची लागवड करतात. मात्र, शेतकर्‍यांना नाईलाजास्तव सरपणासाठी या झाडांची तोड करावी लागते.

शेतातील निरुपयोगी लाकडाचा सरपणासाठी वापर करता यावा म्हणून निस्तार हक्कांतर्गत बीट उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, याचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी पावसाळ्यातील चार ते पाच महिन्यांच्या सरपणाची तजवीज करण्याकरिता शेतात लावलेल्या झाडांवर कुर्‍हाड चालवित असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांना शेतोपयोगी लाकडी साहित्य तयार करण्यासाठी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी काठीपेठा दिला जात होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काठीपेठा देेणे बंद केल्याने शेतकर्‍यांना शेतोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. काही शेतकरी लोखंडी साहित्याचा वापर करीत असून यामुळे जनवारांना इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षीच लाकडाची टंचाई जाणवत असल्याने शेती हंगामात लाकडी साहित्य कसे तयार करावे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत असतो. दिवसेंदिवस लाकूड मिळणे दुरापास्त झाल्याने पूर्वापार बांधण्यात येणारी कौलारू छताची घरे येत्या काही वर्षांत दिसणे कठीण होणार आहे. कौलारू छताच्या घरांना पर्याय म्हणून सिमेंट काँक्रीटच्या घरांना अधिक पसंती मिळत आहे.