Tue, Nov 20, 2018 23:07होमपेज › Jalna › पारंपरिक प्रथांना फाटा देत रुग्णांना मदत

पारंपरिक प्रथांना फाटा देत रुग्णांना मदत

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 19 2018 11:17PMअंबड : प्रतिनिधी

शहरातील लोहिया कुटुंबीयांनी स्व. योगेश लोहिया यांच्या स्मरणार्थ  बाराव्याच्या दिवशी पारंपरिक प्रथांना फाटा देत एकात्मिक सल्ला केंद्रातील दुर्धर आजारी रुग्णांसह वंचित, उपेक्षित घटकातील मुलांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप करून आगळवेगळा उपक्रम राबविला.

बहुतांशी नागरिक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या, तेराव्यासाठी मोठा खर्च करतात. लोहिया परिवाराने प्रथांना फाटा देत सामाजिक जाणीव म्हणून  दप्तर, वह्या, पेन, कंपास, पुस्तके, पाणी बाटली, टिफिन आदी शालेय साहित्यांबरोबरच दैनंदिन स्वच्छतेचे साहित्य, कपडे, साड्या व गोड जेवण दिले.  हा कार्यक्रम अंबड उपजिल्हा रुग्णालय येथे पार पडला. यावेळी 38 दुर्धर आजारग्रस्त कुटुंबातील मुले व पालक, पारधी वस्तीतील 6 मुले आणि 4 महिला, सद‍्गुरू सेवाभावी संस्थेतील 9 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी  डॉ. जे. ए. तलवाडकर, नीलेश लोहिया, संतोष सोमाणी, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे समुपदेशक विजय बनसोडे, डॉ. बजाज, दादासाहेब थेटे, अशोक शहा, गणेश मिरकड, सोपान पाष्टे, मोईन शेख, सुभाष काळे यांच्यासह नागरिक तसेच लोहिया परिवारातील  सदस्य उपस्थित होते .