Wed, Jul 24, 2019 12:55होमपेज › Jalna › जिल्ह्याला गारपिटीचा फटका

जिल्ह्याला गारपिटीचा फटका

Published On: Feb 12 2018 1:50AM | Last Updated: Feb 12 2018 12:34AMजालना :

जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतात काढून ठेवलेली ज्वारी, गव्हासह हरभरा आंबा, द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवघ्या काही मिनिटांच्या झालेल्या गारपिटीत निसर्गाने शेतकर्‍यांच्या स्वप्नावर नांगर फिरवला. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. वंजार उम्र्रद येथे नामदेव लक्ष्मण शिंदे व जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथील आसाराम गणपत जगताप (60) यांचा गारपिटीच्या तडाख्याने मृत्यू झाला. गारपिटीत अनेक गायी, बैल व शेळया जखमी झाल्या. 

जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर व जाफराबाद तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या गारपिटीसह जोरदार वादळी वारे व पावसामुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त केले. शहर व परिसरात रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह गारांच्या पावसास सुुरुवात झाली. अवघ्या एक ते दीड मिनिटे पडलेल्या लिंबा एवढ्या गारांनी शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान केले. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीसह गव्हाचे उभे पीक आडवे केले.

हरभरा पीक गारपिटीने मातीमोल झाले. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या फटक्याने हिरावून घेतले.  खरिपात पडलेला अत्यल्प पाऊस त्यानंतर कापसावरील बोंडअळीमुळे  शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला असतानाच जीमदार आलेले रब्बीचे पीकही हातातून गेल्याने तो पुरता उद्ध्वस्त झाला आहे. जालना शहरात सकाळ झालेल्या वादळी वार्‍यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक भागांत झाडांच्या फांद्या तारेवर पडल्याने उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरुळीत होऊ शकला नाही. 

अंबड तालुक्यात गारपिटीसह पाऊस 

अंबड तालुक्यात  अनेक गावांत रविवार  (दि.11) रोजी सकाळी सात वाजेदरम्यान  वादळी वारे व गारपिटींसह अवकाळी पाऊस पडला. अंबड, मठपिंपळगाव, वडीगोद्री, लोणारभायगाव, पारनेर, बारसवाडा, दहिपुरी, डोमलगाव, बारसवाडा, साष्टपिंपळगाव, शहागड, गोंदी,  गहू -ज्वारीसह द्राक्ष डाळिंब, अंबा, हरभरा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यंदा चांगले पीक येऊनही कवडीमोल भावाने शेतमाल विक्री करण्याची वेळ आल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यातच झालेल्या गारपीट व  पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसमोरील संकटात आता भर पडली. पारनेर येथेही सकाळी गारपीट झाली. त्यात  शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान झाले. 

मंठ्याचे झाले सिमला

गारपिटीमुळे मंठा गावाचे सिमला झाल्याचा भास निर्माण झाला होता. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. कोट्यवधी रुपयांच्या शेतीमाल व शेडनेटचे  नुकसान झाल्याने उद्ध्वस्त झालेला शेतकरी जगायचे कसे या विवंचनेेने हैराण झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेउन त्यांना पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

जाफराबादेत फळपिकांसह शेडनेटचेही नुकसान

जाफराबाद तालुक्याला रविवारी प्रचंड गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. काढणी योग्य असलेला गहू, ज्वारी, हरभरा, डाळिंब, आंबा आदी फळपिकांसह शेडनेटमधील मिरची आणि शेड नेटचे प्रचंड नुकसान झाले. 

तालुक्यातील सातेफळ, नळविहिरा, सावरगाव, भातोडी, ब्रह्मपुरी, वरुड बु., भारज, सिपोरा अंभोरा, कोळेगावसह अनेक गावांत लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसुली यंत्रणेमार्फत तत्काळ पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी केली आहे.