Thu, Aug 22, 2019 08:34होमपेज › Jalna › महिलांच्या सक्षमीकरणास हातभार

महिलांच्या सक्षमीकरणास हातभार

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:34AMजालना : प्रतिनिधी

महिला स्वयंसहायता  बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने प्रत्येक विभाग, जिल्हा तसेच तालुका स्तरावर विक्री प्रदर्शने आयोजित करून महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा महोत्सवातून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
येथील कै. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी लोणीकर बोलत होते. यावेळी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार वितरण सोहळाही घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, महिला व बालकल्याण सभापती सुमनबाई  घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा,  प्रकल्प संचालक बेदमुथा, अरुणा शिंदे, बी.डी.ओ तांगडे, स्मिता म्हस्के, भानुदास घुगे, दिलीप तौर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोणीकर म्हणाले की, अशा  महोत्सवामुळे बचत गटांनी  तयार केलेल्या मालाची विक्री करण्याची चांगली संधी मिळते. विक्री प्रदर्शन महोत्सवाच्या  माध्यमातून सुरू केलेली महिला सक्षमीकरणाची आणि सामाजिक उपक्रमांची चळवळ सामाजिक क्रांंती घडविणारी आहे. ग्रामीण भागातील महिलांना सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व देऊन देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने विकास साधता येईल. नियमित बचतीमुळे महिलांच्या उद्योगशील कल्पनाशक्तीला आर्थिकदृष्ट्या बळ मिळाल्याने गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करणारे उद्योग सुरू होत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे, असेही ते म्हणाले.