होमपेज › Jalna › पावसाळ्यापूर्वी वॉटरग्रीड योजनेचे काम पूर्ण करा

पावसाळ्यापूर्वी वॉटरग्रीड योजनेचे काम पूर्ण करा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:00PMजालना : प्रतिनिधी

जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटरग्रीड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाईप टाकण्याची कामे कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत या कामात हयगय अथवा दिरंगाई करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा लोणीकर यांनी दिला.

वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, किशोर शिंगरू, अधीक्षक अभियंता अजय सिंग, भालेराव आदीची उपस्थिती होती.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला परतूर, मंठा व जालना तालुक्यात समाविष्ट 176 गावासाठी ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठ्याचा 234 कोटी रुपयांचा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या एक वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. पावसाळ्यामध्ये शेतकर्‍यांची मशागतीचे कामे सुरू होत असल्याने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात.  त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावे.

या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे. गुणवत्ता पथकाकडून दर्शविण्यात येणार्‍या त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सुचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.