Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Jalna › आदेशाअभावी ग्रामपंचायती सुस्त!

आदेशाअभावी ग्रामपंचायती सुस्त!

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:21PMजालना : प्रतिनिधी

शासनाने प्लास्टिक, कॅरिबॅगवर बंदी घालून सहा दिवस झाले तरी अद्यापही ग्रामीण भागात याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना या संदर्भात काहीच निर्देश देण्यात आलेले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या नेमक्या कोणत्या विभागाने   कारवाईचे नियंत्रण करावे, याबाबत मतैक्य होत नसल्याचे समजते. राज्यात राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. यामध्ये वापरावर बंदी आहेच याशिवाय कॅरिबॅग प्लास्टिक  विक्री करणार्‍या दोघांनाही दंडाची तरतूद आहे. नगरपालिकांच्या हद्दीत थोड्याफार प्रमाणात कारवाईला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कॅरिबॅग, प्लास्टिक जप्त करून संबंधित व्यापारी, व्यवसायिकांना दंड करण्यात आला आहे, मात्र ग्रामीण भागात अद्यापही या संदर्भात काहीच निर्णय झालेला नाही. यामुळे ग्रामपंचायतीने कारवाई सुरू केलेली नाही. कॅरिबॅग, प्लास्टिक वापरामुळे लहान मोठ्या गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कॅरिबॅग खाल्ल्याने पाळीव जनावरे मृत होण्याचे प्रमाण ग्रामीण भागातच अधिक आहे, असे असताना जिल्हा परिषदेकडून या संदर्भात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये कारवाईचे नियंत्रण कोणत्या विभागाने करायचे, या संदर्भात काहीच मतैक्य नसल्याचे दिसत आहे. पंचायत तसेच पाणी आणि स्वच्छता मिशन विभागाच्या कर्मचार्‍यांमध्ये यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे शासनाचा जीआर निघून सहा दिवस उलटत आले तरी जिल्हा परिषदेकडून यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पत्रच देण्यात आलेले नाही. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक आदेशाची वाट पाहात आहे.  प्रत्यक्ष कारवाईला केव्हा सुरुवात होणार याबाबत संभ्रम आहे.

ग्रामसेवक म्हणतात, निर्देश नाहीत

शासनाने निर्गमित केलेल्या निर्णयात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना कॅरिबॅग व प्लास्टिक वापराबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामसेवक जिल्हा परिषदेकडून निर्देश आले नसल्यामुळे कारवाई करण्यास सुरुवात केली नसल्याचे सांगत आहेत.

ग्रामीण भागात विक्री जोमात

मोठ्या गावांसह लहान खेड्यांमध्येही कॅरिबॅगची व प्लास्टिकची विक्री जोमात सुरू आहे. प्रत्येक गावांच्या आठवडी बाजारात पाहणी केल्यानंतर हे लक्षात येऊ शकते. तसेच ग्राहकांकडूनही कॅरिबॅग मागितली जात आहे व दुकानदारही सर्रास उघडपणे ग्राहकांना कॅरिबॅग देत आहेत. किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर होत आहे.