Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Jalna › इंग्रजी शाळांना ग्रामीणमध्ये ‘अच्छे दिन’

इंग्रजी शाळांना ग्रामीणमध्ये ‘अच्छे दिन’

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:18AMजाफराबाद : ज्ञानेश्‍वर पाबळे

मागील काही वर्षांत आपल्या मुलांनाही शहरातील मुलांप्रमाणे इंग्रजी शाळेतील शिक्षण मिळाले पाहिजे, असे पालकांना वाटत आहे. यामुळेच आजच्या स्थितीत ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. गावागावांत इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जि.प. शाळांवर याचा परिणाम होत आहे.

ग्रामीण भागातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून मुले आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या,  इंग्रजी शाळांचे प्रमाण आणि या शाळेत प्रवेश घेण्यासाठी गगणाला भिडलेले प्रवेश शुल्क या सर्वांचा विचार करता इंग्रजी शाळांना अच्छे दिन आले आहेत. जाफराबाद तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मागील वर्षीपर्यंत 25 तर यावर्षी 6 अशा एकूण 31 नवीन इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. 

दिवसेंदिवस या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे. तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. या शाळेत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत असून शासनाच्या सर्व सुविधा युक्त असणार्‍या  जिल्हा परिषद शाळा मात्र ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शाळेत स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळे पोशाख बाहेरून मागविले जातात. त्याचा खर्च पालकांकडून वसूल केला जातो. निकाल जाहीर झाल्यावर पालकांच्या हाती पुस्तकांसह इतर साहित्याची यादी दिली जाते. ठराविक दुकानातून ते खरेदी करण्यास सांगितले जाते. तेथे हे सर्व साहित्य वाढीव दराने विकले जाते. 

दरवर्षी इमारत फंड वसूल केला जातो. शिवाय दरवर्षी वाढीव शुल्क घेतले जाते. पुस्तक, गणवेश आणि इतर साहित्यासाठी शुल्क आकारले जाते. दर महिन्यात होणार्‍या सभेत पालक वाढीव शुल्काबाबत बोलतात. त्यावेळी मुलांची फी देऊ शकत नसाल तर दुसर्‍या शाळेत टाका असे व्यवस्थापकांकडून सांगितले जाते. शाळेच्या बसेस ठरलेल्या आहेत. त्या बसने विद्यार्थ्यांना पाठवावे लागते. 

खासगी वाहनाने शाळेत सोडण्याची व्यवस्था केली तर शाळेला ते चालत नाही. शाळेत विविध उपक्रमासाठी दर महिन्यात मुलांकडून पैशाची मागणी केली जाते. पैसे वेळेत पाठविले नाही तर पालकांच्या नावाने चिठ्ठी पाठवतात. अशा प्रकारची मनमानी अनेक इंग्रजी शाळांचे संस्थाचालक व व्यवस्थापनाकडून केल्या जात असल्याने नाराजी आहे.