Wed, Mar 20, 2019 12:52होमपेज › Jalna › हेक्टरी 60 हजार नुकसान भरपाई द्या : खा. चव्हाण

हेक्टरी 60 हजार नुकसान भरपाई द्या : खा. चव्हाण

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:20AMजालना : प्रतिनिधी 

जिल्ह्यात चार दिवसांपर्वी झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह  गारपिटीमुळे शेतकर्‍याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे ड्रोण कॅमेर्‍याद्वारे करून शेतकर्‍यांना हेक्टरी सरसकट 60 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

    जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कॉँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्‍वभूमीवर जालना येथे आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल, कॉँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, ज्येष्ठ नेते नवाब डांगे, आदींनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. वंजार उम्रद येेथे नामदेव शिंदे या मयत शेतकर्‍याच्या कुटुंबाला भेट देऊन मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच शेतकर्‍यांशी  संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, द्राक्ष, अंबा, मोसंबी आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून तलाठी, मंडळाधिकारी पंचनामे करण्यासाठी तत्परता दाखवत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी त्यांच्याशी बोलताना केला. अनेक शेतकर्‍यांचे जनावरे गारपिटीत मरण पावले असून, त्याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबवले जात आहे, अशा व्यथाही त्रस्त शेतकर्‍यांनी मांडल्या.  प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली का असा प्रश्‍न शेतकर्‍यांना उपस्थित केला असता, बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे सोडा अद्याप कर्जमाफीच झाली नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.