होमपेज › Jalna › सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीची वीज 

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीची वीज 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:08AMजालना  : प्रतिनिधी

शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या व वहन आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी देण्यात येत आहे. गणेश मंडळांनी अधिकृत वीज घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले. 

याबाबत प्रसिद्धी पत्रकात महावितरणने म्हटले आहे की,  गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गणेश मंडळांनी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रकमेतील उर्वरित रक्‍कम गणेश मंडळांना त्वरित परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.

सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट वीजदर आहेत. बिलिंग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्‍त 13 पैशांनी अधिक आहे, तर वाणिज्य दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा.   सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. विजेची जोडणी करताना अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी.

वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाचे दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले व टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात.