Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Jalna › इंधन दरवाढीने सामान्यांची होरपळ

इंधन दरवाढीने सामान्यांची होरपळ

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 11:40PMजालना : सुहास कुलकर्णी

जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ग्रामीण भागात ट्रॅक्टरने नांगरणीचा खर्च वाढला असून शहरी भागात सर्वसामांन्याना दुचाकी चालविणे महागाचे ठरत आहे.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा  परिणाम झाला आहे. या दरवाढीबाबत नागरीकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जालना शहर हे व्यापारी केंद्र असल्याने या शहरात इंधन दरवाढीसारखा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या वस्तूच्या भाव वाढीवर होतो. आज घराघरांत सायकलीची जागा दुचाकीने घेतली आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा महिन्याला जवळपास चारशे ते पाचशे रुपयांचा जास्तीचा फटका सर्वसामांन्याना सहन करावा लागत आहे. शहरात स्टील,  बियाणे व खत निर्मितीचा उद्योग मोठा असल्याने इंधन वाढीमुळे या वस्तूच्या भावावर थोडाफार परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात नांगरटीचे भाव 1000 रुपयांवरून डिझेल दरवाढीनंतर 1200 रुपयांपर्यंत गेले आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्यास भाव वाढ करतात. मात्र इंधनाचे भाव कमी झाल्यास ते भाव कमी करत नसल्याचा आरोप काही व्यावसायिकांनी केला. गत काही महिन्यांत पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य होरपळून निघत आहे. 

जीएसटी अंतर्गत कधी येणार?

पेट्रोल-डिझेलवर केंद्र, राज्य आणि महापालिकेकडून वेगवेगळे कर लावण्यात येतात. त्यामुळे 27-28 रुपये मूळ किंमत असणारे हे इंधन 71 ते 85 रुपये प्रतिलिटर दराने नागरिकांना खरेदी करावे लागते. हे सगळे कर रद्द करून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बव्हंशी घट होईल आणि महागाईवर नियंत्रण मिळवता येणार आहे.

दररोज होतेय 12 पैशांची वाढ : केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील नियंत्रण उठविल्यापासून दररोज किमतीत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण वाढीचा अंदाज घेतल्यास या दोन्ही इंधनांची दरवाढही सरासरी 12-13 पैशांची होताना दिसते. यावरून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत इंधन शंभरी गाठणार, हे नक्‍की!