Thu, Jun 27, 2019 10:04होमपेज › Jalna › ड्रायव्हिंग स्कूल चालकांचा नियमांना कोलदांडा !

ड्रायव्हिंग स्कूल चालकांचा नियमांना कोलदांडा !

Published On: Mar 08 2018 12:44AM | Last Updated: Mar 08 2018 12:44AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. विशेषतः प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध न करणे, दृक्श्राव्य लघुपटाची माहिती न दाखविणे, नागरिकांना रस्ता सुरक्षा, वाहतुकीच्या नियमाबद्दल प्रशिक्षण देण्यात येत नाही. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओ विभाग मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग स्कूलद्वारे नागरिकांना वाहन चालविण्याचे धडे देणार्‍या प्रत्येक संस्थेची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याआधी त्याला वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा अर्थ समाजवून सांगणे गरजेचे आहे.

त्यासाठी प्रशिक्षण संस्थेच्या नियमांचे तक्ते, चित्रफीत मार्गदर्शक पुस्तिका, रस्त्यावरील सिग्नलची माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. तसेच दोन कंट्रोल असलेल्या नवीन वाहनातून नागरिकांना प्रशिक्षित मार्गदर्शकाद्वारे वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी संस्था बांधील आहे, मात्र शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून वाहतुकीच्या नियमांसह मोटार वाहन कायद्याचे पालन केले जात नाही. 

मोटार वाहन नियमानुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थीला किमान 12 तासांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसाला साधारणतः अर्ध्या तासाचे प्रशिक्षण अर्जदाराला देणे आवश्यक आहे, मात्र अनेक ड्रायव्हिंग चालकांकडून प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्याऐवजी दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये एकाच वाहनात तीन ते चार नागरिकांना बसवून मोटार वाहन नियमांना बगल देत प्रशिक्षणाचा कालावधी आटोपला जात आहे. मोटार वाहन नियमांना कोलदांडा दाखविणार्‍या ड्रायव्हिंग स्कूल चालकांविरुध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.