Mon, Nov 19, 2018 00:38होमपेज › Jalna › तीन दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंद

तीन दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंद

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:59AMजालना : प्रतिनिधी

शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर 19 एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्यापैकी 5 हजार 497 शेतकर्‍यांची खरेदी बाकी आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्र 1 फेबु्रवारीला सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने 15 फेबु्रवारीपर्यंत आठही खरेदी केंद्र सुरू झाले. या खरेदी केंद्रांवर 18 एप्रिलपर्यंत नऊ हजार 152 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या सहा हजार 153 शेतकर्‍यांना एसएमएसही पाठविण्यात आलेले आहे. त्यापैकी फक्‍त तीन हजार 653 शेतकर्‍यांकडून 34 हजार 99 क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. अद्याप पाच हजार 497 शेतकर्‍यांची तूर खरेदी करणे बाकी आहे. शासनाने 19 एप्रिल रोजी खरेदी बंद केली आहे. बहुसंख्य शेतकर्‍यांची तूर अद्याप शिल्लक असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे मुदतवाढीची मागणी होत आहे.   

एक फेबु्रवारीपासून तूर केंद्रांवर दिवसाला 10 ते 12 तास ग्रेडिंग मशीनद्वारे काटा सुरू करण्यात आला होता. दिवसाला 250-300 क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदीनंतर तूर वेअर हाउसला पाठविण्यात येत आहे. मध्यंतरी जागेअभावी तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते; परंतु आता जागा उपलब्ध आहे. आतापर्यंत 3 हजार 653 शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यापैकी फक्‍त 1700 शेतकर्‍यांना तुरीचे पैसे वाटप करण्यात आले आहेत.  विकलेल्या तुरीचे पैसेही मिळत नाही, तसेच  मुदत संपल्याने आपली तूर खरेदी होणार की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत.

Tags : Jalna, three, days, close,  purchase, center,  tur