होमपेज › Jalna › इंधनासह खतांच्या किमतीतही भाववाढ

इंधनासह खतांच्या किमतीतही भाववाढ

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:46PMजाफराबाद : प्रतिनिधी

डिझेल व पेट्रोल दरवाढीनंतर आता खताचे भाव ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर वाढल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांचे कंबर मोडल्याचे दिसत आहे. 

एकीकडे रासायनिक खते निर्माण करणार्‍या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने किमती वाढविण्याची सूट मिळाली आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या कृषी मालाचा उत्पादन खर्चावर भाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी कंगाल होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त आहे. शेतीच्या कामात बैलजोडीचा वापर कमी झाला.

शेतीची बहुतेक कामे ट्रॅक्टर व तांत्रिक माध्यमातूनच होत आहे. दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे खरिपासाठी बियाणे व खताचे नियोजन बिघडले आहे. मागील खरिपात डीएपी 50 किलो बॅग 1,160 रुपयांची होती, ती आता 1,250 रुपयांची झाली आहे. तर 10.26.26 खत 1,050 रुपयात मिळायचे ते आता 1,160 रुपयांत मिळत आहे. एकंदरीतच सर्वच प्रकारच्या खतांच्या दरात 80 ते 100 रुपयांनी वाढ झालाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खताच्या दरात व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत पाच वर्षांपूर्वीच्या दराच्या तुलनेत आजच्या दरात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

गत एका वर्षात खताचे दर आठ वेळा वाढल्यचे दिसून येते. उत्पादन खर्चानुसार किमती आकारण्याची मुभा असल्यामुळे कंपन्या मालामाल होत आहे. तर शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या वल्गना करणार्‍या सरकारच्या राज्यात शेतकर्‍यांच्या मात्र उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के कमी भावाने विकल्या जात आहे. म्हणूनच शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे पेरणी करावी अथवा नाही या बाबात शेतकर्‍यांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.