Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Jalna › कर्जमाफीनंतरही थांबेनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या 

कर्जमाफीनंतरही थांबेनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या 

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:14PMजालना : सुहास कुलकर्णी 

जिल्ह्यात कर्जमाफीनंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी 2018 ते 28 मे 2018 पर्यंत अवघ्या पाच महिन्यांत 38 शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. शासनातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांना 16 लाखाची मदत करण्यात आली आहे. 

नापिकी, कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना, विष प्राशन अथवा गळफास घेऊन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 2012 पासून दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. शेतीमालाला भाव नसतानाच ग्रामीण भागात मजुरीचे दर दरवर्षी वाढत आहेत. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने ट्रॅक्टरने करण्यात येणार्‍या नांगरटीसह इतर कामाचे भाव वाढले आहे. 

नवीन कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ

कर्जमाफी करण्यात येउनही अद्याप अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. खरीप हंगाम तोंडावर येउनही कर्जमाफीचा तिढा न सुटल्याने बँका नवीन कर्ज देण्यास शेतकर्‍यांना टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतीव्यवसाय करावयाचा कसा असा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात 10 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात 9 आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले तर 1 शेतकरी अपात्र ठरला. फेब्रुवारी महिन्यात 8 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात एक प्रकरण प्रलंबित आहे. जानेवारी व फेब्रुवारीत आत्महत्याग्रस्त 16 शेतकरी कुटुंबियांना 16 लाखांची मदत करण्यात आली. मार्चमध्ये 11, एप्रिलमध्ये 2 तर मेमध्ये 7  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 21 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही. 

38 पैकी 16 पात्र, 21 प्रकरणे प्रलंबित

जिल्ह्यात 38 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपैकी 16 शेतकरी मदतीसाठी पात्र  तर 1 शेतकरी अपात्र ठरला  आहे. 21 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबत अद्याप शासनातर्फे चौकशी करून  निर्णय  घेण्यात येणार आहे.   

जिल्ह्यात 10 एप्रिलपर्यंत  20 बँकाच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 851 शेतकर्‍यांचे 593 कोटी 69 लाख 61 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यास तयार नाहीत.