Fri, Apr 26, 2019 01:43होमपेज › Jalna › पिकांच्या पंचनाम्याची शेतकर्‍यांकडून मागणी 

पिकांच्या पंचनाम्याची शेतकर्‍यांकडून मागणी 

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:36PMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतकर्‍यांच्या बागांसह इतर शेतीमालाचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांच्या नुकसानाचे पंचनामे शासनाच्या वतीने तातडीने करण्याची मागणी वडीगोद्री, आंतरवाली, पिठोरी सिरसगाव, सौंदलगाव, ढाकलगाव आदी गावांतील शेतकर्‍यांनी केली आहे. 

 वडीगोद्री भागात शुक्रवार, 1 जून रोजी सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. 

जवळपास पाऊणतास झालेल्या या वादळी पावसामुळे केळी, मोसंबींच्या बागांचे नुकसान झाले. वडीगोद्री शिवारात गट नं.74 मध्ये बाबासाहेब कोंडिबा गावडे यांच्या शेतातील दोन एकर केळीची  बाग वादळी वार्‍याने उद्धवस्त झाली. गट नं.72 मध्ये कोंडिबा गावडे यांचा अर्धा एकर ऊस वादळी वार्‍यात जमीनदोस्त झाला आहे. धाकलगाव शिवारात संगीता ज्ञानेश्‍वर आटोळे यांच्या  गट नं.265 मध्ये  800 मोसंबीची झाडे आहेत. त्यापैकी 30-35 झाडे मोडली आहे. परिसरातील अनेक गावांत घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. जनावरांसाठी लावलेल्या कडब्यांच्या गंजीची मोठी पडझड होऊन कडब्याचे नुकसान झाले आहे. अनेक गावांत मोठी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करून शासनाने  नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.