Tue, May 21, 2019 00:48होमपेज › Jalna › महामार्गाचे काम शेतकर्‍यांनी अडविले

महामार्गाचे काम शेतकर्‍यांनी अडविले

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:45PMराजूर : प्रतिनिधी 

हसनाबाद, राजूर-देऊळगावराजा  प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचे काम परिसरातील 80 शेतकर्‍यांनी मावेजाचे कारण देत अडविले आहे. शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेऊन मावेजाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली तर कंत्राटदाराने पोलिस संरक्षणात बुधवारी काम सुरू केले.

महामार्गासाठी ज्या शेतकर्‍यांची जमीन जात आहे, त्यांची संमती घेण्यात आली नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. रस्त्यालगत असणार्‍या शेतकर्‍यांना सूचना, कायदेशीर नोटीस दिलेली नाही. महामार्गासाठी राजूर व चांदई  एक्‍को येथील शेतकर्‍यांची जमीन जात असल्यामुळे 80 शेतकर्‍यांनी न्याय मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतलेली आहे. बुधवारी कंत्राटदाराने पोलिस संरक्षणात  राजूर ते चांदई एक्‍को रस्त्यावरील काम सुरू केले होते. मात्र, संतप्त शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडले. जमिनीचा मावेजा मिळेपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्ग हसनाबाद - राजूर - देऊळगावराजा असा 70 किलोमीटर आहे. हा रस्ता संपूर्ण सिमेंट कॉक्रीटचा आहे. कंत्राटदाराने थेट कामाला सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍यांतून संताप व्यक्‍त होत आहे. संबंधित गुत्तेदाराने बुधवार रोजी दुपारी चार वाजेदरम्यान राजूर येथील चांदई एक्‍को रस्त्यावर जेसीबीद्वारे रस्त्याचे खोदकाम सुरू  केले. न्यायालयात गेलेल्या शेतकर्‍यांनी रस्त्याचे काम थांबविले. शेतकरी काम करू देत नसल्यामुळे कंत्राटदाराने पोलिस बंदोबस्त मागविला, परंतु शिवसेनेचे कैलास पुंगळे यांनी शेतकर्‍यांची  कैफियत  पोलिसांसमोर मांडली. वाद उद्भवू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतला. मोबदला मिळेपर्यंत काम सुरू केले जाणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.  शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, दलित आघाडी सेनेचे भास्कर मगरे, संतोेष टोंपे, सतीश टोंपे, राजू जगताप, विठ्ठल जगताप, बबन पुंगळे, जावेद शहाँ, अंकुश जगताप यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.