जाफराबाद : प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकर्याने खरेदी केलेली बियाणे बोगस निघाली असून, कोबीला शेंगा लागल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित शेतकर्याने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी शिवनारायण खंबाट यांनी दि.15 डिसेंबर 2017 रोजी जाफराबाद येथून कोबीचे तीन पॅकेट बियाणे खरेदी करून त्याची लागवड 0.20 आर क्षेत्रात केली. मात्र बियाणे बोगस निघाल्याने त्या ठिकाणी एकही कोबीचे रोप न येता बारीक शेंगाचे झाड उगवले आहे. त्या झाडांचे पाने कोबीसारखे आहेत. त्यांना फुलोरा आलेला आहे. या अनोळखी झाडांना बारीक आकाराच्या शेंगा येत आहेत.
खंबाट यांनी दुकानदाराला वारंवार तोंडी तक्रार केली मात्र उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी 12 एप्रिल रोजी कृषी अधिकार्यांकडे अर्ज केला. कृषी विभाग काय कारवाई करते याची प्रतीक्षा शेतकर्यास आहे. कृषी विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकर्याचे म्हणणे आहे.
लागवड 0.2 आर क्षेत्रामध्ये महानंदी कंपनीने बोगस बियाणे दिल्यामुळे लागवड खर्च, बियाणे खर्च, औषधी व मजूर यावर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामा करून संबंधितावर कारवाई करून शेतकर्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
Tags : jalna, Farmar fraud, bogus seed,