Wed, Nov 13, 2019 12:45होमपेज › Jalna › खाद्यतेलाच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ

खाद्यतेलाच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:55AMजालना : प्रतिनिधी

खाद्यतेलावरील आयात शुल्कात 30 टक्क्यांवरून 44 टक्के वाढ करण्यात आल्याने बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत तब्बल 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. भाववाढीमुळे  किचन कॅबिनेटचे गणित कोलमडले आहे. पूर्वी सोयाबीनच्या एका लिटरसाठी ग्राहकानां 75 ते 85 रुपये मोजावे लागत होते. आता 85 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

जालना शहर हे मराठवाड्यात खाद्यतेलाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. दररोज शहरात तेलाची जवळपास दोन  ते तीन कोटींची उलाढाल होते. शहरात पाच सोयाबीन रिफायनरी करणारे मोठे कारखाने आहेत. या शिवाय भारतातील मोठ मोठ्या कंपन्यांचे तेल दररोज शहरात येते. फक्त तेलाचा व्यापार करणारे शहरात 300 पेक्षा जास्त व्यापाारी आहेत. आयात शुल्कात वाढ झाल्याने शहरात ठोक बाजारात पामतेलाच्या 15 किलोच्या डब्यामागे तब्बल 100 रुपये, तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या डब्यामागे किमान 30रुपये वाढले आहेत. तुपाचा डबाही 80 रुपयांनी महागला असून, हरभर्‍याचे दर किलोमागे 5 ते 7 रुपयांनी भडकले आहेत. यामुळे महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. 

कच्च्या पामतेलावरील आयात शुल्क 30 टक्कयांवरून वाढवून 44 टक्के व रिफाइंड पामतेलावरील आयातशुल्क 40 टक्कयांवरून वाढवून 54 टक्के केले आहे. तीन महिन्यांपूर्वीही अशीच मोठी करवाढ केली होती. यामुळे रात्रीतून देशभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या होत्या.

पामतेलाचा 15 किलोचा डबा 1230 रुपयांवर पोहोचला असून, त्याची किंंमत दोन दिवसांपूर्वी 1130 रुपये होती.

 फॉर्च्युन सनफ्लॉवरची याच वजनाच्या डब्याची किंमत 1240 रुपयांवरून 1270 पोहचली.

मुरली सोयाबीन तेलाचा डबा 1280 रुपयांवरून 1310 रुपयांवर पोहोचला आहे. 

तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची शासनाला कोणतीही गरज नव्हती. शासनाने जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. अस्थिर भावामुळे बाजाराचे गणित कोलमडले आहे. शासनाला बाजारपेठेचे गणित समजले नसून ते निर्णय लादण्याचे काम करीत आहे. 

सतीश पंच, शहराध्यक्ष व्यापारी महासंघ