Wed, Jul 24, 2019 07:55होमपेज › Jalna › उन्हाळ्यामुळे डोळ्यांचे आजार वाढले

उन्हाळ्यामुळे डोळ्यांचे आजार वाढले

Published On: May 12 2018 1:27AM | Last Updated: May 12 2018 12:35AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर गेला आहे. वाढत्या उन्हामुळे सर्दी-डोकेदुखीसोबतच डोळ्यांना त्रास उद्भवत आहे. वाहनांचा धूर आणि हवेतील धुळीमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्याने नेत्रालयात गर्दी वाढत आहे.

लग्न-समारंभाची धावपळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे बालकांसह ज्येष्ठ व्यक्तीही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नेत्ररुग्णांची संख्या वाढली आहे. नेत्ररोग तपासणीसाठी दवाखान्यात गर्दी होत आहे. शहर व ग्रामीण भागात यावर्षी संपूर्ण एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सरासरी तापमान चाळीशी पार पडली आहेत. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढतच आहे. हवेतील धुळीचे कण वाहनाच्या वेगाने पसरू लागल्याने, डोळ्यांच्या समस्यांत वाढ होत आहे. डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी दवाखान्यात डोळे तपासणीसाठी गर्दी वाढली आहे. डोळे चुरचुरणे, डोळे दुखणे, अंधारी येणे, अंधुक दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळा लाल होणे, खाज येणे, डोळे कोरडे पडणे, टोचल्यासारखे वाटणे, जळजळ होणे आदी समस्या निर्माण होत आहेत. 

अशी राखावी डोळ्यांची निगा :  प्रखर सूर्य किरणांपासून डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या दर्जाचे गॉगल, छत्री व टोपीचा वापर करावा, स्वच्छ व थंड पाण्याने सतत डोळे धुवावेत, महिलांनी चेहर्‍यावर सौंदर्य प्रसाधने वापरताना डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. रस्त्यावरील फॅशनेबल गॉगल्स वापरू नयेत. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांसह कलिंगड, पपई, गाजर, दूध तसेच रसाळ फळांचा समावेश करावा. यामुळे काळजी घेण्यास मदत होईल, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.