Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Jalna › आत्महत्या हा वेडेपणाच नव्हे तर महापाप!

आत्महत्या हा वेडेपणाच नव्हे तर महापाप!

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:17AMजालना : प्रतिनिधी 

अध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्महत्या हे महत्पाप असल्याने कोणी कितीही अडचणी, संकटे आली तरी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, हा प्रकार केवळ वेडेपणाचा असल्याचे डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले.

मंठा तालुक्यातील वाई येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात कीर्तनसेवेचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. संत एकनाथ महाराजांच्या भाव धरूनिया याची ज्ञानेश्‍वरी, कृपा करी हरी तयावरी या अभंगावर निरुपण करताना डॉ. फड म्हणाले की, साधूसंतानी आत्महत्या  हा भित्रा व पापाचरणाचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. आजची परिस्थिती उद्याची राहात नसते. काळ हा अत्यंत बलशाली आहे. त्यामुळे झटकन जीवन त्यागण्याचा निर्णय घेऊच नये. 

मानवी जीवनासारखे दुसरे कोणतेही जीवन सुंदर नाही. स्वतःच्या जीवनात आलेले नैराश्य माणूस बोलून दाखवत नसतो. तेव्हा अशा वेळी सर्वांनी त्याला समजून घेतले पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. आपले प्रेमाचे दोन शब्द त्याला मृत्यूपासून परावृत्त करू शकतात. आई-वडिलांचे खरे हित त्यांची  मुले चांगली निर्माण होण्यातच असते.  चांगले वागण्यासाठी पैसा नाही तर फक्त माणुसकी जोपासावी लागते.

कन्या व पुत्रात फरक नको : कन्या आणि पुत्रात फरक न करता त्यांची सात्विकता वाढवून आपणही आनंदा घ्यावा आणि देवाला म्हणजे समाजालाही आनंद मिळू द्यावा, आई-वडिलांकडून होणार्‍या चुकीच्या वर्तनाचा विपरित परिणाम मुलांवर होत असतो. असा झालेला विपरित परिणाम सहजासहजी दुरुस्त करता येत नाही. म्हणून पालकांनी आधी केले मग सांगितले असे वागले पाहिजे, असेही डॉ. फड यांनी सांगितले.