Tue, Jul 23, 2019 02:43होमपेज › Jalna › महा-ई सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन 

महा-ई सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन 

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:38AMजालना : प्रतिनिधी

महा-ई-सेवा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी  झुंबड उडाली आहे, मात्र सातत्याने सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी विलंब होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना रांगेत तासन्तास उभा राहण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका प्रमाणपत्राची नोंदणी करण्यासाठी वीस मिनिटे ते अर्धा तासाचा कालावधी लागत आहे.

जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिलीयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्र प्रवेशासाठी आवश्यक आहेत. कागदपत्र मिळवण्यासाठी महा-ई-सेवा  केंद्रामध्ये नोंदणी करावी लागते, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प झालेली ऑनलाइन यंत्रणा अद्यापही सुरळीत झालेली नाही. 

यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा कालावधी रांगेत घालवावा लागत आहे. सर्व माहिती अपलोड झाल्यानंतरच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. सकाळी रांगेत उभे राहिल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत यंत्रणा मंद असल्यामुळे नोंदणी होत नाही.

सहा महिन्यांपासून अडचण

6 महिन्यांपासून सेतू सुविधा केंद्रांमध्ये अडचण निर्माण झाली आहे. तरीही शासनाच्या तांत्रिक विभागाकडून यासंदर्भात काहीच केले जात नाही. विद्यार्थी शेतकरी व अन्य नागरिकांची गरज ओळखून तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक आहे.

अनेक वेळा जावे लागते परत

दुपारच्या दरम्यान रांगेमध्ये उभे राहिले तर सायंकाळपर्यंत नोंदणी करण्यासाठी नंबर लागत नाही. यामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांना पुन्हा दुसर्‍या दिवशी लवकर येऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. पारदर्शकतेसाठी ऑनलाइन सुविधा केली असली तरी आता हिच सुविधा विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे.