Thu, Nov 15, 2018 09:33होमपेज › Jalna › ढोबळेंच्या समर्थनार्थ मोर्चा 

ढोबळेंच्या समर्थनार्थ मोर्चा 

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 11:06PMजालना : प्रतिनिधी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना काळी शाई लावल्याच्या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे व मुख्याधिकारी यांच्यातील वाद धुमसतच आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनी ज्ञानेश्‍वर ढोबळे यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. 

मुख्याधिकारी खांडेकर यांनी प्रभागातील कामांना मंजुरी न दिल्याने शनिवार, 2 जून रोजी नगरपालिका कार्यालयात नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांनी मुख्याधिकार्‍यांच्या तोंडाला काळी शाई फासल्याने कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर मंगळवारी नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या वॉर्डातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नगरसेवक ढोबळे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, प्रभाग क्रमांंक 11 मध्ये विकासकामे करा, मुख्याधिकार्‍यांच्या कारभाराची चौकशी करा, या पालिकेचे करायचे काय -खाली डोके वर पाय या व या सारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खपले निवेदन देऊन वॉर्डातील विविध समस्यांबाबत कैफियत मांडली. मोर्चात  मायाबाई रत्नपारखे, पारुबाई कांबळे, मिराबाई घुगे, मुक्ता बोराडे, अनुसूया देठे, शकुंतला कलिगे, आशाबाई जाधव, विजय कसबे, करण ढोबळे, नंदू वाघचौरे, संजय आहेर, संतोष चोरमारे यांच्यासह वॉर्डातील महिला पुरुष सहभागी झाले होते.