जालना : प्रतिनिधी
तीन तलाक कायदा हा इस्लामी कायद्यानुसार असून त्यात इतरांनी केलेली ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत मुस्लिम महिलांनी तीन तलाक कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत निषेध केला. रेल्वेस्टेशन ते मोतीबागपर्यंत शनिवार(24) रोजी इदगाह मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. तहसीलदार बिपीन पाटील यांनी व्यासपीठावर येऊन महिलांचे निवेदन स्वीकारले.
मल्टिपर्पज शाळेच्या प्रांगणातून शनिवारी सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शिस्तीत मोर्चा गांधी चमन, टाऊन हॉल, कचेरी रोड मार्गे मोर्चा इदगाह मैदानावर नेण्यात आला. कार्यक्रमास औरंगाबाद मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या मुुन्निसा बेगम, शबाना आइमी, फरहाना रहिम अन्सारी समीना यास्मीन अ. हफीज, रुबीया बेगम अमजदखॉन, मुमताज बेगम अतिया सलीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुलींना हुंडा नको, संस्कार द्या
मुन्नीसा बेगम यावेळी म्हणाल्या, आज समाजात लग्नविधीत डीजे व व्हिडिओ शुटिंगसारख्या काही वाईट प्रथा आल्या आहेत. त्या दूर करणे आवश्यक आहे. सासूने सुनेला मुलीसारखे तर सुनेने सासूला आईसारखे वागवणे गरजेचे आहे. मुलींना हुंडा नाही तर संस्कार द्या, असे आवाहनही मुन्नीसा बेगम यांनी केले.
...तर गय केली जाणार नाही
मुस्लिम महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकारासाठी त्यांनी तीन तलाकचे बील लोकसभेत मंजूर केले, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र पंतप्रधानांनी आमची काळजी सोडून हिंदू महिलांची काळजी करावी. या धर्मात सती प्रथेसारखी प्रथा बंद होऊनही अनेक स्त्रिया सती जातात. हिंदू विधवा स्त्रियांना अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही. त्याही आमच्या बहिणी आहेत. आमचा कायदा हा आमचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. त्यात दखल देणार्यांची गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.