Fri, Apr 26, 2019 19:25होमपेज › Jalna › आपत्ती व्यवस्थापन; जिल्हा प्रशासन सज्ज

आपत्ती व्यवस्थापन; जिल्हा प्रशासन सज्ज

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 11:25PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पावसाळ्यात पुरासारख्या उद्भवणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी  प्रशासन सज्ज झाले आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी  नदीकाठची गावे, शाळा यांची यादी प्रशासनाच्या वतीने तयार ठेवण्यात येत आहे. 31 मेनंतर या सर्व बाबींचा आढावा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने घेण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी लगबग सुरू होते. पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी यांसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यासाठी विविध यंत्रणा सज्ज असतात. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील अनेक जणांना प्रशिक्षण दिले जाते. इतक्यावरच न थांबता आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री तसेच यंत्रणेचा आढावा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याद्वारे घेतला जातो. एकूणच आपत्ती व्यवस्थापन हे जबाबदारीचे काम आहे.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने 100 लाइफ जॅकेट, 100 टयूब, 20 लाउडस्पिकर, 10 फायर सूट, 10 हेल्मेट, 100 आग विझविणारे यंत्र, 4 रबर बोट, 2 पोर्टेबल टेन्ट सज्ज ठेवण्यात आले आहे.

गतवर्षी या विभागास 7 लाख 35 हजारांचे बजेट देण्यात आले होते. गेल्या अनेक वषार्र्ंत मोठे पूर न आल्याने आपत्ती व्यवस्थापनतर्फे करण्यात येणार्‍या तयारीचा म्हणावा तसा कस लागलेला नाही, मात्र या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने जोरदार पाऊस पडल्यास जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी, पूर्णा, दुधनासह इतर नद्यांच्या काठावरील गावांवर सतर्कतेच्या दृष्टीने लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याबरोबरच अनेक ठिकाणी जलयुक्‍तची कामे झाल्याने पावसाळ्यात जलयुक्‍तमुळे अडविलेले पावसाचे पाणी धोकादायक बनू शकते. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागणार आहे.