Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Jalna › धनगर आरक्षणासाठी चक्‍का जाम

धनगर आरक्षणासाठी चक्‍का जाम

Published On: Aug 14 2018 1:28AM | Last Updated: Aug 14 2018 1:27AMजालना ः प्रतिनिधी

धनगर  आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (13) रोजी शहरासह जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणार्‍या भाजप सरकारचा निषेध व्यक्त करून येळकोट...येळकोट..जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर मेंढ्या तसेच जागर गोंधळचा कार्यक्रम घेण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

जालना शहरात औरंगाबाद, अंबड चौफुली, सिंदखेड नाका यांसह तालुक्यातील पीरपिपळगाव, रामनगर,  वीरेगाव, गोलापांगरी येथे रास्ता रोको  करण्यात आला. प्रांरभी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासह आरक्षणासाठी बलिदान देणारे परमेश्‍वर घोंगडे यास श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या प्रतिनिधीना  मागण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला 12 ऑगस्टचा अल्टिमेट देण्यात आला होता. परंतु शासनाने यांची दखल न घेतल्याने  धनगर समाजाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन जाहीरनाम्यात मागणी घेतली होती, परंतु चार वर्षे उलटूनही शासन धनगर आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. शासनाने ऑगस्टअखेरपर्यत शासनाने योग्य ती दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समाजाच्या वतीने  देण्यात आला.    

या आहेत धनगर समाजाच्या मागण्या

• धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती तत्काल लागू करणे. 
• सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. 
• अंबड येथील आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
• आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या परमेश्‍वर घोंगडेच्या कुटुंबास आर्थिक मदत देऊन एका सदस्यास शासकीय नोकरी द्या. 
• मेंढ्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावेे, शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करणे. 
• धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमण्यात यावे आदी धनगर समाजाच्या मागण्या आहेत.
•  धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावातील धनगर समाजबांधवांना मारहाण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा.