Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Jalna › धनगर आरक्षण : जालना जिल्हा कडकडीत बंद

धनगर आरक्षण : जालना जिल्हा कडकडीत बंद

Published On: Aug 14 2018 1:28AM | Last Updated: Aug 14 2018 1:18AMधनगर आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदला संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्यात आला. ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्‍का जाम, रॅली व मोर्चे काढण्यात आले. धनगर समाज आरक्षणास विविध पक्ष तसेच संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

जामखेड
जामखेड ः प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील जामखेड व परिसरातील धनगर समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.हा महामार्ग तब्बल दीड तास बंद केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भाजपने  धनगर समाजाला सत्तेत असल्यास तत्कळ आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तेत येऊन चार वर्षे उलटूनही धनगर समाजाच्या प्रश्‍नाला फक्‍त बगल देण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळेच सकल धनगर समाजाने महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदमध्ये जामखेड व परिसरातील धनगर समाज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. जामखेड येथे सकाळी नऊच्या दरम्यान समाजाने पारंपरिक वेशभूषेत, बैलगाडी मोर्चा काढला. सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोकोमध्ये अनेक जण सामील झाले. जामखेड फट्यावर सगळीकडेच पिवळे वादळ दिसत होते. यावेळी समाजातील तरुण परमेश्‍वर घोंगडे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू कराव्या म्हणून आत्महत्या केली. त्या तरुणाला समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

घनसावंगी
घनसावंगी ः प्रतिनिधी
सकल धनगर समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला घनसावंगीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाकडून घनसावंगी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.व्यापार्‍यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शहरातील व्यापारी वर्गाने या बंदला प्रतिसाद दिला आहे. बंदमुळे सर्वदूर शुकशुकाट होता. परिसरातील अत्यावश्यक सेवा असणारे दवाखाने, मेडिकल दुकाने, बँका सुरू होत्या तर  कडकडीत बंद पाळण्यात आला असून धरणे आंदोलनाला तालुक्यातील भरपूर धनगर समाज आणि समाजातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. या वेळी प्रशिक्षणार्थी एसडीओ संजयकुमार ढवळे यांना महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

रामनगर
रामनगर : प्रतिनिधी
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून इतर प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी रामनगर येथे जालना-मंठा महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (ता. 13) चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या सुरुवातील अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जालना-मंठा राज्य रस्त्यावर सकल धनगर समाज बांधवांनी  ठिय्या  देऊन रस्ता रोखून धरला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सोमवारी रामनगर येथे आठवडी बाजार असतो. सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आंदोलनास व्यापारी महासंघ, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी पाठिंबा दिला. 

अंबड
अंबड : प्रतिनिधी
धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे वचन सरकारने पाळले नाही, यामुळे संतप्त समाज सोमवारी रस्त्यावर उतरला. अंबड शहरात कडकडीत बंद पाळत, जालना-बीड रोडवर रास्ता रोको  आंदोलन  करण्यात आले. आरक्षणाबाबत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी  समाज संतप्त झाला असून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. शहरात मोटारसायकल रॅली काढून शहरातील व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाला विविध संंघटनांनी पाठिंबा दिला. आरक्षणाविषयी कोमल नाझरकर या मुलीने तडाखेबंद भाषण केले.या नंतर बळीराम खटके, बाळासाहेब तायडे, विलास लांडे यांची भाषणे झाली.

राजूर
राजूर ः प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 13) शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने शेळ्या-मेंढ्यांसह शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध करण्यात आला. आरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 

भाजपने केला विश्‍वासघात 

निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महादेव जाणकारांना हाताशी धरून समजाबरोबर विश्‍वासघात केला. समाजाच्या भावना जर मुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन खुर्ची खाली करावी.