Fri, Jul 19, 2019 22:14होमपेज › Jalna › शेंद्रा-जालना योजनेतून बदनापूरला पाणी देण्याची मागणी

शेंद्रा-जालना योजनेतून बदनापूरला पाणी देण्याची मागणी

Published On: May 29 2018 1:40AM | Last Updated: May 28 2018 11:36PMजालना : प्रतिनिधी

बदनापूर शहराला शेंद्रा-जालना पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्याची मागणी नगरपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. या योजनेतून पाणी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो  प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येत आहे. या योजनेतून पाणी देण्याच्या मुद्यावर जालना व  बदनापूर यांच्यात संघर्ष उडण्याची शक्यता दिसत आहे. 

बदनापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बदनापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरील सोमठाणा धरणातील विहिरीतून सध्या बदनापूर शहरास पाणीपुरवठा केला जातो.

नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नगरपंचायतच्या वतीने शेंद्रा -जालना योजनेतून पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या योजनेतून 5 ते 7 एम.एल.डी. पाणीपुरवठा केला जात असून जालना औद्योगिक वसाहतीला दररोज अंदाजे 3 एम.एल.डी. पाणी लागते. 

बदनापूर शहराची गरज दररोज 1 एम.एल.डी ची आहे. या पार्श्‍वभूमीवर बदनापूर नगरपंचायत शेंद्रा-जालना पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळण्याचा दावा करीत आहे.

दुसरीकडे जालना शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असून आता आयसीटी व ड्रायपोर्टसारखे नवीन मोठ्या प्रकल्पाची त्यात भर पडली  आहे. यामुळे जालनेकंराची पाण्याचीं गरज वाढणार आहे. बदनापूरला पाणी दिल्यास येथील नवीन प्रकल्पासाठी पाणी आणायचे कोठून, हा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने बदनापूरला या योजनेतून पाणी देण्यास जालनेकरांचा विरोध आहे. जालना शहरास पाणीपुरवठा करणार्‍या  जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबडने पाणी घेण्यास सुरुवात  केली आहे. 

पाण्यासाठी राजकीय वजन

अंबड नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून आमदार नारायण कुचे यांच्या भावजय संगीता कुचे या नगराध्यक्ष आहेत. जालना-अंबड यांच्यात पाण्याचा वाद सुरू असतानाच आता आमदार नारायण कुचे हे अंबड पाठोपाठ बदनापूरसाठी पाण्याच्या मागणीसाठी राजकीय वजन वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच बदनापूर नगरपंचायतीत सत्तांतर होऊन तेथे भाजपची सत्ता आल्याने आमदार कुचे आता बदनापूरच्या पाणीप्रश्‍नाबाबत आग्रही भूमिका घेणार असे दिसत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा आमदार कुचे हे राजकीय मोर्चेबांधणी करून शेंद्रा पाणी पुरवठ्यावरील दावा मजबूत करण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे.