Mon, Mar 25, 2019 09:47होमपेज › Jalna › लोकसभा लढवण्याचा निर्णय क्रांतिदिनी : आ. कडू 

लोकसभा लढवण्याचा निर्णय क्रांतिदिनी : आ. कडू 

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 25 2018 11:59PMभोकरदन : प्रतिनिधी

जालना लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून आग्रह आहे. याकरिता 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी निर्णय घेऊन जालन्यातून लोकसभा लढवायची की नाही, हे ठरविले जाणार असल्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी सांगितले. 

प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या आसूड यात्रेचा समारोप शुक्रवारी (दि. 25) भोकरदन येथे झाला. याप्रसंगी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आयोजित सभेत आ. कडू बोलत होते. ते म्हणाले की, भाजप सरकारने शेतकर्‍यांची थट्टा केली तर सामन्यांची वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्येचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, तरीदेखील केंद्र व राज्य सरकार संवेदनशून्य आहेत. प्रहार जनशक्‍ती संघटना शेतकरी, कामगार व सर्वसामान्यानांना न्याय देण्यासाठी लढणारा पक्ष आहे. माझ्यासाठी खासदारकी प्रिय नसून, 15 ते 20 वर्षांपासून संघर्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्हाला नेत्याची नव्हे तर कार्यकर्त्यांची सत्ता हवी आहे. आगामी निवडणुकीत शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. सूत्रसंचालन नानासाहेब वानखेडे यांनी केले तर प्रास्तविक अंकुश जाधव, श्रीमंत राऊत यांनी केले. जिल्हातील सर्व पदाधिकार्‍यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

200 कोटींचा हिशेब द्यावा 

रावसाहेब दानवे हे लाटेत खासदार झालेले आहेत. नोटाबंदीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुलाच्या लग्‍नाला 200 कोटी रुपये खर्च केले. याचा हिशेब भाजप व दानवे यांनी द्यावा, असा सवालही आ. कडू यांनी उपस्थित केला.