Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Jalna › आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 22 2018 12:52AMजालना : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचारासह बोंडअळीचे चुकीचे सर्वेक्षण, सिंचन विहिरींच्या प्रलंबित विषयांसह इतर  मुद्दयावर जिल्हा परिषदेची सभा चांगलीच  वादळी ठरली. जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, शालिकराम म्हस्के  यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्यावर सभागृहात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी जिल्हा परिषदेची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, कृषी सभापती जिजाबाई कळंबे, शिक्षण सभापती रघुनाथ तौर आदींची यावेळी उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी जयमंगल जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहात असल्याच्या तक्रारी सदस्य प्रत्येक सभेत करीत असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र स्वतःच्या अधिकारात नसलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजेची लाखो रुपयांची बिले मंजूर करून मोठ्या प्रमाणावर अनियमितता करीत असल्याचा आरोप केला. यावेळी पुराव्यादाखल त्यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांनी उचललेल्या 1 कोटी 46 लाख रुपयांच्या बिलाची आकडेवारी सभागृहासमोर सादर केली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना जाधव यांनी दिलेल्या तक्रारीची प्रतही त्यांनी पत्रकारांना दिली. या बिलात 50 टक्क्यांत तुम्ही अन् 50 टक्क्यांत करण्यात आल्याचा आारोप जाधव यांनी केला. वैद्यकीय अधिकारी तीन-तीन महिने गैरहजर राहात असताना त्यांच्या रजा उशिराने मंजूर केल्या कशा जातात, असा प्रश्‍न जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला. डॉ. गिते दबंगगिरी करतात असेही ते म्हणाले. यावेळी शालिकराम म्हस्के यांनी अध्यक्षांनी या गंभीर आरोपांकडे लक्ष देऊन डॉ. गिते यांचा पदभार तातडीने काढून घ्यावा व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. जिल्ह्यात बोंडअळीने बाधित क्षेत्राचे चुकीचे पंचनामे करण्यात येत असल्याचा आरोप बाप्पा गोल्डे यांनी केला. तीन महिने उलटूनही सिंचन विहिरींचा प्रश्‍न लोंबकळत ठेवण्यात आल्याचा आरोप राहुल लोणीकर यांनी केला.

या प्रकरणी 1 सप्टेबर रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सागितले.