Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Jalna › राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात

राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:16AMजालना : प्रतिनिधी

नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याने काही दिवसांत हा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहरातील राजकारणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक वॉर्डात भाजपचे वर्चस्व राहावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास जालन्यात निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. या वेळी जालन्याचा गड सर करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीतही पक्षाची भक्‍कम तटबंदी करण्याचे प्रयत्न भाजपने सुुरू केले आहे. त्यासाठीच इतर पक्षांतील नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देणे सुरू करण्यात आले आहे. 

जालन्याचा गड मजबूत करण्याचा प्रयत्न भाजप करीत असतानाच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाही विधानसभा व लोकसभेत शह देण्याचा प्रयत्न दानवे करीत आहेत. दुसरीकडे खोतकर यांनी दानवे यांच्या भोकरदनच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी करीत दानवेच्या गडात मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.