Sun, Jul 21, 2019 01:30होमपेज › Jalna › संगणकीकृत सातबार्‍याचे काम प्रगतिपथावर

संगणकीकृत सातबार्‍याचे काम प्रगतिपथावर

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:36AMजालना : प्रतिनिधी

तालुक्यात संगणकीकृत सातबारा 1 मे पर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग कामाला लागला आहे. दोन दिवसांत काम पूर्ण होण्यासाठी फेरफार आणि 7/12 ऑनलाइन करण्याच्या कामात शनिवारी (दि.28) महसूल अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र तहसीलमध्ये दिसून आले. 

तालुक्यातील 144  गावांतील  7/12 उतारा ऑनलाइन करण्याचे काम महसूल विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तसेच सुटीच्या दिवशीही रात्री आठपर्यंत कर्मचारी व्यस्त आहेत. हे 7/12 ऑनलाइन झाल्यानंतर शेतकर्‍यांना तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्र आणि तलाठ्याकडे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यांना तासन्तास ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही. शिवाय वेळेत 7/12, फेरफार उतारा या प्रक्रियेमुळे वेळेत डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध होणार आहे.

सातबारा ऑनलाइन झाल्याने आता कोठेही सहज उपलब्ध होणार असल्याने यात आर्थिक भुर्दंड न होता पारदर्शक कारभार होऊन शेतकर्‍यांची सोय होणार आहे. भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार करण्याचे काम तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत  आहे. प्रत्येक 7/12 अचूक ऑनलॉइन करण्याचे काम गतीने सुरू असून एक मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हस्तलिखित 7/12 कालबाह्य ठरणार आहे. महसूल विभागाने सर्व कामे संगणकीकरणाने जोडण्यासाठी तहसीलदार डॉ. बिपीन पाटील यांनी नियोजन केले आहे.

सातबारा संगणकीकृत करण्यासाठी तहसीलदार डॉ. बिपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संदीप ढाकणे, मंडळ अधिकारी भार्डीकर, काळे, कुलकर्णी, मोटाले, तलाठी सांबळे, खांडेभराड, ए.आर. पाटील, प्रियंका घोबळे, कणके, भिसे, मोहारीर, कलकुंबे,  श्रीमती घांगरमाळे, भावले, श्रीमती देशमुख, सरवदे, ए.के. केदार आदी परिश्रम घेत आहे.

यापासून मिळणार मुक्ती

शेतकर्‍यांच्या जमिनीचा मूळ आत्मा 7/12 असून अनेक कारणाने होणारा फेरफार शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. चुकीच्या फेरफारमुळे आजही कित्येक शेतकर्‍यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. हस्तलिखित कायम आणि फेरफारसाठी शेतकर्‍यांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे. ई-फेरफार व संगणकीकृत सातबारा ऑनलाइन करताना मागील चुका दुरुस्त करूनच अद्ययावत होणे गरजेचे आहे. यामुळे पुन्हा उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही. ऑनलाइन प्रक्रियेमुळे कामात पारदर्शकता येणार आहे; परंतु घाईघाईने केलेल्या प्रक्रियेत पुन्हा डोकेदुखी वाढणार नाही, याची दक्षता महसूल विभागाने घेणे आवश्यक आहे.