Mon, Aug 19, 2019 05:55होमपेज › Jalna › आन्वा परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा

आन्वा परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:58PMआन्वा : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील आन्वा शेत शिवारात बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थाने केला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  वन विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

आन्वा येथील ईदगाह परिसरात गट नंबर 16 या गायरान जमिनीत सोमवारी एका शेतकर्‍याने बिबट्यासदृश प्राणी जमिनीवर लोळताना पाहिल्याने त्याची भंबेरी उडाली. गायरान परिसरात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. या भागात बिबट्या वास्तव्यास असावेत अशी चर्चा होत आहे. ज्या शेतात बिबट्या आला असल्याची माहिती मिळाली तेथे गावातील हवालदार, हरिभाऊ हजारे, शिवा हजारे, गणेश देशमुख, अकबर खान यांनी पाहणी केली असता त्यांना तेथे बिबट्यासदृश प्राण्याच्या  पायाचे ठसे दिसून आल्याचा दावा करण्यात आला.आन्वा परिसरात भीषण पाणीटंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांना वनवन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे हे प्राणी पाण्याच्या शोधार्थ या परिसरात दाखल झाल्याचे दिसून येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बी.सी.जाधव व डी.एस.गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जमिनीवरील वाघाच्या पायाच्या ठशाची पाहणी केली. हे ठसे वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवून त्या प्राण्याबाबात माहिती घेण्यात येईल. ग्रामस्थांना जागृत करण्यासाठी गावामध्ये दवंडी देउन सतर्क करण्यात येणार आहे.