Sun, May 19, 2019 14:44
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › शहर अस्वच्छतेला नगरसेवकही वैतागले

शहर अस्वच्छतेला नगरसेवकही वैतागले

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:34AMअंबड : प्रतिनिधी

नगर परिषदेकडून शहरात नियमित स्वच्छता  होत नसल्याने वाढत्या कचर्‍यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नाही. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शहराची बकाल अवस्था झाली आहे. स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सूचना देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.

शहरातील काही भागांतर्गत रस्त्याच्या कडेला नाल्या आहेत. मात्र, वेळोवेळी त्याची साफसफाई होत नसल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजारालाही निमंत्रण मिळत असल्याची तक्रार करीत, अंबड नगरपालिकेचा कारभार सुरळीत करवा, असे साकडे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी नगरसेवकांनी घातले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी दिलेल्या संचखड फॅसेलिटी या कंपनीने स्वछता न करता फक्‍त पैसे लाटण्याचे काम केले. यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी नव्याने निविदा प्रसिद्ध झाल्या, परंतु मुख्याधिकारी बदलीच्या प्रयत्नात असल्याने अंबड पालिकेत गैरहजर असत, तर नगराध्यक्ष औरंगाबाद निवासी असल्याने नगरपालिकेचा कारभार आलबेल झाला आहे.

स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरातील गटार साफसफाईसह सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा उचलण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. निवेदनावर गटनेते शिवप्रसाद चांगले, नगरसेवक काकासाहेब कटारे, संजय साळवे, डॉ. अविनाश वडगावकर, अस्मा अफरोज पठाण यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.