Mon, Aug 19, 2019 13:26होमपेज › Jalna › लहानग्यांनी जपली सर्व संतांची शिकवण 

लहानग्यांनी जपली सर्व संतांची शिकवण 

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:15PMजालना ः प्रतिनिधी

महाराष्ट्राची वारकरी परंपरा सरस्वती भुवन प्रशालेच्या चिमुकल्यांनी जपत संतांची वेशभूषा करीत लक्ष वेधले. 

सर्वधर्मसमभाव, प्लास्टिकबंदी यासाठी कापडी पिशव्यांचे वितरण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान याचे महत्त्व व संदेश या दिंडीतून दिले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी केलेले रिंगण हे वारकरी रिंगणाच्या धर्तीवर केले होते. आपण माउलीच्या दिंडीमध्ये पंढरीला पायी वारीमध्ये  जात आहोत, असा भास आनंदीस्वामी मठाकडे जाताना वाटत होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला साक्षात पंढरपूर जालन्यात अवतरले होते.

हा अविस्मरणीय क्षण जपण्याचे भाग्य जालनेकरांना मिळाले. स. भु. स्थानिक मंडळाचे सचिव प्रा. राम भाले, मुख्याध्यापक धनंजय पाटील, पर्यवेक्षक पद्माकर इंगळे यांनी मृदंग, टाळ-पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल-रुख्मिणीचे पूजन करून पालखी सोहळा  प्रशालेतून निघाला. हरिनामाचा गजर करत, टाळमृदंगाच्या गजरात  मुली, महिलांनी फुगड्या  खेळत मठात पोहचली. यावेळी शिक्षक व शिक्षिकांची उपस्थिती होती. यावेळी संतोष जोशी, रत्नाकर लांडगे, जयमाला सिंदखेडकर, स्वाती कल्याणकर, नीता दहिवाळ, उषा जाधव चेतना भालेराव उपस्थित होते.

शेलगावात चिमुकले रमले दिंडीत

शेलगाव ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. या वारीचा अनुभव घेण्यासाठी  शेलगाव  येथील देसरडा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी वारकर्‍यांच्या पोषाखात गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर केशरी गंध, हातात टाळ, वीणा, मृदंग डोक्यावर तुळशी  घेऊन  दिंडी काढली. गावातील सर्व देव-देवतांचे दर्शन घेऊन गावची नगर प्रदक्षिणा केली या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. ग्रामस्थ कुतूहलाने पाहत होते.