Tue, Mar 26, 2019 12:12होमपेज › Jalna › जलयुक्त शिवारांमुळे  १४९ गावांचा चेहरामोहरा बदलणार

जलयुक्त शिवारांमुळे  १४९ गावांचा चेहरामोहरा बदलणार

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:54AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात 2017 -18 या वर्षात  149 गावांतील जलयुक्‍त शिवारच्या कामासाठी 78 कोटी 16 लाख रुपयांची रक्‍कम खर्च केली जात असून आगामी काही दिवसांत या गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे. 
जलयुक्‍त शिवारच्या कामाला मिळालेल्या लोकसहभागामुळे या कामास चांगले यश मिळाले आहे. 2015 ते 2017 दरम्यान नाला खोलीकरण व तलावातील गाळ काढण्यात आल्याने 93 हजार 639 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे.

या कामामुळे परिसरातील पाणीपातळीत तब्बल 2.5 मीटरने वाढ झाली असून जलयुक्‍त शिवार अभियानामुळे 2 लाख 80 हजार 917 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यात 93 हजार 639 एक संरक्षित सिंचनाखाली तर 1 लाख 87 हजार 278 हेक्टर जमीन दोन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. 267 किमीचे नालाखोलीकरण करण्यात आले असून त्यात शासकीय मशीनद्वारे 31.99 लक्ष घनमीटर तर 40.68 लक्ष घनमीटर लोकसहभागातून करण्यात आले आहे. जलयुक्‍त शिवारमुळे या वर्षी उन्हाळयात पाणी टँकरची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

ज्या गावात उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत होत्या त्या गावात जलयुक्‍तच्या कामामुळे पाणी समस्या दूर झाली आहे. जलयुक्‍तच्या कामात शासकीय यंत्रणेसोबत महाजन ट्रस्ट, पाणी फाउंडेशन, नाम यासारख्या संस्था व लोकांनी पुढाकार घेतल्याने आज दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या जालना जिल्ह्याचे रूप पालटू लागले आहे. अंबड, घनसावंगी तालुक्यांसह इतर तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढु लागले आहे. 

जाफराबाद तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने 72 गावांची निवड झाली असली तरी प्रत्यक्षात जवळपास  16 ते 17 गावांतच कामे सुरू झाली आहेत. जलयुक्‍त शिवारचे यश लक्षात आल्याने या चळवळीने आज गावागावांत जनचळवळीचे रूप घेतले आहे.