Sun, Apr 21, 2019 14:31होमपेज › Jalna › क्रीडा साहित्य खरेदीत अपहार

क्रीडा साहित्य खरेदीत अपहार

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:27AMटेंभूर्णी : प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडा साहित्य खरेदीसाठी आलेल्या पाच लाख रुपयांचा धनादेश साहित्य खरेदी न करता बुलडाणा येथील एका विक्रेत्याच्या नावे देण्यात आला. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी अपहार  केल्याचा आरोप शिवसेना शहर शाखा प्रमुख गजानन मुळे यांनी केला आहे. संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी पोलिस ठाण्यात निवेदनही दिले आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेसाठी जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा निधी 14 मे रोजी शाळेला प्राप्त झाला, परंतु शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक जी. एस. पवार यांनी क्रीडा साहित्याची खरेदी न करता दि. 18 मे रोजी बुलडाणा येथील एका साहित्य विक्री करणार्‍या दुकानदाराच्या नावे पाच लक्ष रुपयांचा धनादेश वर्ग करून दिला. 

कुठल्याही प्रकारची निविदा न काढता अथवा साहित्य न घेता संबंधित मुख्याध्यापक आणि दुकानदार यांनी या रकमेचा अपहार केल्यामुळे गावकर्‍यांनी पंचनामा केला. यासंदर्भात विद्यमान मुख्याध्यापक राधाकिसन लहाने म्हणाले, आर्थिक अभिलेखे सादर करण्यासाठी वारंवार संबंधित मुख्याध्यापकांना फोनद्वारे मागणी केली. साहित्य खरेदीबाबत मला माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. मी घेतलेल्या पदभार यादीमध्ये कुठल्याही प्रकारचे क्रीडा साहित्य माझ्याकडे सुपूर्द केलेले नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी गावकर्‍यांना लिहून दिले. 

संबंधित दुकानदाराला स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेश दिलेला असून त्यातून धनादेश क्रमांक 615754 द्वारे पाच लक्ष रुपये जमा झाल्याचे दिसून येते. संबंधितांकडून रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुळे यांच्यासह योगेश शर्मा, राज देशमुख, आयुब कुरेशी, विनोद शेळके यांच्यासह नागरिकांनी केली आहे. दरम्यान क्रीडा साहित्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.