Thu, Aug 22, 2019 13:14होमपेज › Jalna › मग्रारोहयो विहीर प्रकरण; दोन बीडीओ रडारवर 

मग्रारोहयो विहीर प्रकरण; दोन बीडीओ रडारवर 

Published On: Mar 22 2018 2:01AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMजालना :  प्रतिनिधी

जिल्ह्यात मग्रारोहयो विहीर प्रकरणात परतूरचे गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांचे निलंबन करण्यात आले. मात्र याच प्रकरणात अनियमितता करणारे बदनापूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी मेथे व अंबडचे गटविकास अधिकारी डी. टी. भिसे यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुुरू आहे. दरम्यान हे दोन्ही अधिकारी सध्या रडारवर आहेत.

जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकर्‍यांसाठी एकूण 4 हजार 500 विहीरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात  बदनापूर, घनसावंगी, मंठा व परतूर या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी 562 तर अंबड, भोकरदन, जाफराबाद व जालना या चार तालुक्यांसाठी 563 विहिरींचे उद्दिष्ट गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले होते. त्यात परतूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी राजेश तांगडे 563 विहिरींचे उद्दिष्ट असतांना तब्बल 2073 विहिरींना मंजुरी दिल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले. याच प्रकरणात अंबड येथील गटविकास अधिकारी डी. टी. भिसे यांनी 563 विहिरीचे  उद्दिष्ट असताना तब्बल 1268 विहिरींना मंजुरी दिली, तर बदनापूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी मेथे यांनी 562 विहीर मंजुरीचे उद्दिष्ट असताना 708 विहिरींना मंजुरी दिली. उद्दिष्टापेक्षा जास्त विहिरीना मंजुरी देताना मोठे अर्थपूर्ण व्यवहार करण्यात आले.

अंबड तालुक्यात तर विहीर असलेल्या शेतकर्‍यांनाच पुन्हा विहिरी देण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणी परतूरचे गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांना चौकशी करून निलंबित करण्यात आले. मात्र अंबडचे गटविकास अधिकारी डी. टी. भिसे व बदनापूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी मेथे यांच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. एकाच प्रकरणात एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर याच प्रकारच्या अनियमिततेत इतर दोन जणांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा विषय संशयाचा व चर्चेचा बनला आहे. गटविकास अधिकारी डी. टी. भिसे हे वर्ग 1 चे अधिकारी असल्यामुळे त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार आयुक्‍तांना असल्याची माहिती या प्रकरणात ऐकावयास मिळाली. बदनापूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी मेथे हे वर्ग-2 चे अधिकारी असून त्यांचे निलंबन अद्याप झालेले नाही. सध्या तरी दोन्ही अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. 

Tags : jalna, jalna news,Both officials, currently, radar.