होमपेज › Jalna › कांदा लागवडीपासून शेतकरी दूर

कांदा लागवडीपासून शेतकरी दूर

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMभोकरदन : प्रतिनिधी 

तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांनी कांदा लागवड केली नाही. टंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. पाणी मिळत नसल्याने रब्बी हंगामासाठी पाणी कसे पुरवावे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. काही महिन्यांपूर्वी पाणी असताना मोजक्याच भागांत रब्बी हंगामाची तयारी शेतकर्‍यांनी सुरू केली होती. मात्र अचानक तेही पाणी कमी होत गेल्याने काही ठिकाणी पेरणी केलेल्या ज्वारी आणि रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. आता तर कुठेच पाणी नसल्याने यावर्षी कांदा लागवडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांमध्ये सूर्यफूल, गहू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर राहायची. आता मात्र परिस्थिती बदलली असून दुष्काळामुळे निदान जनावरांना शाळू ज्वारीचा चारा झाला नाही. तालुक्याच्या अनेक भागांत हळद व अद्रक पिकांवर अधिक भर दिला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी या पिकांचे भाव पडल्याने आणि या वर्षी पाणीच नसल्याने पिकेही गायब झाली आहेत.