Mon, Jul 15, 2019 23:48होमपेज › Jalna › शेतकरी झिजवताय बँकांचे उंबरठे

शेतकरी झिजवताय बँकांचे उंबरठे

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMभोकरदन : प्रतिनिधी

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकर्‍यांना वेळेवर पीककर्ज देण्याच्या सर्व बँकांना राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. पीककर्ज वाटपासाठी बँका निकषात बदल करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांकडे बँकेचे कर्ज आहे. तसेच नव्याने पीककर्ज मागणी करणार्‍या शेतकर्‍यांनाही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. जुने कर्ज पूर्ण भरल्याशिवाय नवीन कर्जाची मागणी करू नये, अशा सूचना बँकेत दिल्या जात आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकर्‍यांची कर्जप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. 

कर्जमाफीची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्‍कम अद्याप जमा झालेली नाही. या शेतकर्‍यांना नवीन पीककर्जाचे वाटप होणार की नाही, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील असंख्य शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे शेतकर्‍यांना पीककर्जाची चिंता लागली आहे. जिल्ह्यात जिल्हा बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँका असून पीककर्ज वाटपाची प्रक्रिया खूपच मंद गतीने सुरू असून शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.