Mon, Apr 22, 2019 04:03होमपेज › Jalna › शेतकरी आत्महत्यांवर बाबासाहेबांची मार्गदर्शक तत्त्वे प्रभावी

शेतकरी आत्महत्यांवर बाबासाहेबांची मार्गदर्शक तत्त्वे प्रभावी

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:01AMजालना : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांना बियाणे, खते, सिंचनाच्या सुविधा, बाजारपेठ शासनाने उपलब्ध करून द्यावे, असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धरला होता. आज शेतीचे तुकडीकरण झाले असून, दरडोई उत्पन्न घटल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. त्यावर जालीम उपाय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मार्गदर्शक तत्त्वे लागू करावी लागतील, असे प्रतिपादन मंठ्याचे तहसीलदार डॉ. राहुल गायकवाड यांनी केले.कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत सोमवारी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे महत्त्व या विषयावर दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यस्थानी भास्कर आंबेकर हे होते. यावेळी सुभाष म्हस्के, सतीश वाहुळे, मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. गायकवाड म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत तुकडे बंदी कायद्यास वीस वर्षे बाबासाहेबांनी विरोध केला होता. मराठवाडा-विदर्भ शेती उत्पन्नात मागे पडण्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे हेच कारण आहे. अनुसूचित जाती-जमातीकडे शेतीची मालकी अत्यंत अल्प प्रमाणात असून, ही विषमता दूर करावी लागेल.  देवसंस्थानकडे असलेल्या इनामी जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत, तर दुसरीकडे भूमिहीनांची संख्याही मोठी आहे. हा विरोधाभास दूर करण्यासोबतच ग्रामपंचायत ते राष्ट्रपती सचिवालयापर्यंत प्रत्येक क्षेत्रात असलेला अनुशेष शोधून काढावा. याची माहिती संकलित करून, चळवळीतील कार्यकर्त्यांनी शासनाकडे अनुशेष भरण्यासाठी पाठपुरावा करावा, असे सांगून डॉ. गायकवाड म्हणाले परीक्षेत नापास होण्याची भिंती घरातूनच असल्याने वाघिणीचे दूध खिडकीतून दिल्या जाते. प्रत्येक घरात कॉपीमुक्‍त अभियानाची सुरुवात करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन कुलदीप गरड यांनी केले तर मिलिंद कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बबन रत्नपारखे, डॉ. जे. एस. किर्तीशाही, विजयकुमार पंडित, प्रा. सुनंदा तिडके, डॉ. विजयकुमार कुमठेकर, दिगंबर गायकवाड, डी. आर. सावंत, सुहास साळवे, प्रमोद गायकवाड आदींची उपस्थिती होती.  

Tags :  Jalna, Babasaheb, guidelines, farmer, suicides, effective