Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Jalna › बीटी कापूस 75 हजार हेक्टरने कमी होणार 

बीटी कापूस 75 हजार हेक्टरने कमी होणार 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:55PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात बीटी कापसाच्या लागवडीचे क्षेत्र या वर्षी 75 हजार हेक्टरने कमी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापसाच्या पिकावर गतवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागला. गेल्या काही वर्षांपासून कापूस लागवडीत वाढता मजुरीचा खर्च व पडलेल्या भावामुळे कापसाचे पीक शेतकर्‍यांसाठी आतबट्ट्याचे झाले आहे. कापूस पिकाऐवजी सोयाबीन अथवा इतर पिकांतून मिळणारा तुलनेने जास्त पैसा शेतकर्‍यांना आकर्षित करीत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकरी कापसाकडे पाठ फिरविणार असल्याचे दिसत आहे.8 लाख 28 हजार बियाणे पॉकिटांची मागणीआगामी खरीप हंगामासाठी सुमारे आठ लाख 28 हजार बीटी कापसाच्या बियाणांच्या पॅकेटची मागणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. 

बोंडअळीच्या धसक्याने कृषी विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून मेमध्ये होणारी कापूस लागवड टाळण्यासाठी बियाणे विक्रेत्यांना जूनमध्ये कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात खरीप हंगामापूर्वीच कृषी विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने जवळपास 74 लाखांचे बनावट कापसाचे बीटी बियाणे पकडून विभागाने बनावट बीटी बियाणांचा पर्दाफाश करीत बनावट बियाणे विक्री करणार्‍या टोळीच्या म्होरक्यासही गुजरातमधून जेरबंद केले. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांंगण्यात आले.  

इतर व्यवसायांवर होणार परिणाम

या सर्व घडामोडीनंतरही शेतकरी कापसाकडे पाठ फिरवीत असल्याचे पाहून बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांना या वेळी अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कापसाची लागवड कमी झाल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागात मजुरांपासून बियाणे व औषधी कंपन्या, खत विके्रते, कापूस खरेदी करणारे छोटे व्यापारी, कापसाची वाहतूक करणारे टेम्पो व ट्रकचालक या सर्वांवर पडणार आहे. कापूस लागवडीतून कमी झालेले क्षेत्र यावर्षी सोयाबीन, मकासह इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.