Tue, May 26, 2020 22:49होमपेज › Jalna › 'भाजपकडे आहे वॉशिंग मशीन; पक्षात घेण्याआधी गुजरातच्या निरमा पावडरने धुतो'

'भाजपकडे आहे वॉशिंग मशीन; पक्षात घेण्याआधी गुजरातच्या निरमा पावडरने धुतो'

Published On: Aug 29 2019 8:52AM | Last Updated: Aug 29 2019 8:52AM

file photoजालना : पुढारी ऑनलाईन

भाजपमध्ये सध्या जोरात इनकमिंग सुरू आहे. मात्र, आता डागाळलेल्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांबाबत एक वक्तव्य केले आहे. ''भाजपकडे वॉशिंग मशीन आहे, पक्षामध्ये एखाद्याला घेण्याआधी आम्ही त्याला मशीनमध्ये धुतो. त्यासाठी आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे.'' असे वक्तव्य दानवे यांनी जालना येथे बोलताना केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही, आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे, असा असा टोला लगावला होता. त्यावर सुप्रिया सुळेंनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिले होते. मी एक सायन्सची विद्यार्थी असल्याने सांगू शकते की सगळीच रसायने चांगली नसतात. हा रसायनाचा विकास आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या रसायनापासून सावध रहा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते.

भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या भाजपला भ्रष्टाचारी नेते कसे चालतात, त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.