Mon, Aug 26, 2019 00:16होमपेज › Jalna › दोन वर्षांत ३३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन वर्षांत ३३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Published On: Apr 18 2018 12:49AM | Last Updated: Apr 18 2018 12:49AMजालना : प्रतिनिधी

व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या जिल्ह्यात दोन वषार्र्ंमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या 33 घटना घडल्या आहेत. गतवर्षी 15 घटना घडल्या, तर 2016 मध्ये 18 मुलींवर अत्याचार झाले. गतवर्षी केवळ तीनने घट झाली. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अत्याचारामधील बहुतांश आरोपी हे नातेवाइक अथवा ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. 

जिल्ह्यात असिफाप्रकरणी विविध संघटनाच्या वतीने मोर्चे व कँडल मार्च काढण्यात येत असल्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा आढावा घेतला असता जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 दरम्यान अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या  18 घटना घडल्या होत्या. जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 दरम्यान त्यात तीनने घट झाली असून ती 15 वर आली आहे.

जानेवारी ते मार्च 2018 या वर्षात अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांमधे ओळखीचे अथवा जवळचे नातेवाईकांचाच मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे दिसून येते. ओळखीच्या व्यक्‍तीवर असलेल्या भाबड्या विश्‍वासातून असे गुन्हे घडत आहेत. काही घटनेत विकृत मनोवृत्तीतून असे प्रकार केले जात आहे. या घटनांना पोलिसांबरोबरच समाजानेही पुढे येऊन प्रखर विरोध केल्यास असे गुन्हे करणार्‍यांना पायबंद होणार आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रकारही सुरू असल्याने हा मुद्या गंभीर बनत आहे. 

जालना तालुका आघाडीवर 

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक  अत्याचाराबाबत जालना तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. 2016 मधे अत्याचाराच्या एकूण 18 गुन्ह्यांपैकी सर्वाधिक 8 गुन्हे जालना  तालुक्यात झाले. त्यापाठोेेपाठ अंबड 5, घनसावंगी व मंठा प्रत्येकी दोन, भोकरदन 1 तर जाफराबाद, परतूर व बदनापूर तालुक्यात वर्षभरात एकही गुन्हा दाखल झाला नाही. 2017 मध्ये गुन्ह्यांपैकी जालना सर्वाधिक 6, मंठा 3, अंबड व परतुर प्रत्येकी 2, बदनापूर 1 तर जाफराबाद व भोकरदन तालुक्यात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. जानेवारी ते मार्च 2018 मध्ये झालेल्या एकूण तीन गुन्ह्यांपैकी जालना 2 तर बदनापूर तालुक्यात एका गुन्ह्याची नोंद झाली. 

अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात घट झाली असली तरी लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने सर्तक राहावे. अनेक प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे नोंदविले जात नाहीत.                             

 - रसना देहेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा, मानवी हक्क संघटना

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबाबत जालना तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा तीन महिन्यांत शोध न लागल्यास त्याचा तपास बीड येथे असलेल्या अल्पवयीन मुलांच्या तपासासाठी असलेल्या विभागीय पोलिस कार्यालयाकडे सोपविला जातो. अल्पवयीन मुलांचे सर्व प्रकारचे गुन्हे व शोधाबाबत पोलिस यंत्रणा,  जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा गंभीरतेने काम करीत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. 

- लता फड, अप्पर पोलिस अधीक्षक

Tags : Jalna news, 33 minor girl, Atrocities against, two years,