Sun, Oct 20, 2019 02:37होमपेज › Jalna › बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला

बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 1:20AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू केली आहे. तसेच शेतकर्‍यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदा अडीच लाख हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे.

जून महिन्यात अल्प पावसावर कापूस लागवड झाली होती. पीक उगवल्यानंतर काही दिवसात पानांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचे लक्षात आले. बोंडअळी तयार होण्यासाठी आवश्यक पतंग कामगंध सापळ्यात अडकतात. त्यामुळे बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. बोंडअळीमुळे गत वर्षातील उत्पादनातील घट पाहता कृषी विभागाने उपाययोजना मोहीम राबविणे सुरू केले आहे. 

हे आहेत उपाय

कापसावरील गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासठी एकरी आठ कामगंध सापळे लावावेत. त्यानंतर सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रतिसापळा आढळले तर नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 15 मिली किंवा थायोडीकार्ब 75, डब्ल्यू पी 12 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कामगंध सापळे लावावेत

बोंडअळी निर्मूलन मोहिमेत गावातील सरपंचांनी देखील सहभाग नोंदवावा. शेतामध्ये कामगंध सापळे बसवण्यासाठी गावातील शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल व होणारे नुकसान टळता येईल, असे तालुका कृषी अधिकारी ए.के.सुखदेवे यांनी सांगितले.