Tue, Apr 23, 2019 20:03होमपेज › Jalna ›  योग शिबिरासाठी ९९३ ग्राम समित्या

 योग शिबिरासाठी ९९३ ग्राम समित्या

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 30 2018 12:01AMजालना : प्रतिनिधी 

योगगुरू रामदेव बाबा यांच्या उपस्थित पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेले जालन्यातील योग शिबीर हे ऐतिहासिक व्हावे म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे. शिबिराची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी 993 गावांत विविध समित्या नेमल्या असल्याची माहिती पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. आर्य म्हणाले की, प्रारंभी सशुल्क शिबीर घेण्यात येते होते, मात्र गेल्या नऊ वर्षांपासून हे योग शिबीर निःशुल्क घेण्यात येत आहे. जालन्यात हे शिबीर होण्यासाठी आयोजक म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी जबाबदारी उचललेली आहे. 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी होणार्‍या  या शिबिरासाठी योगगुरू रामदेव बाबा 23 फेब्रुवारी रोजीच जालन्यात दाखल होणार आहेत. सकाळी 5 ते 7.30 पर्यंत हे शिबीर चालणार आहे.  या शिबिरासाठी जिल्हाभरातून किमान पन्नास हजार लोकांची उपस्थिती गृहीत धरण्यात आली असून त्यादृष्टीनेच नियोजन करण्यात येत आहे. 

बाहेरगावच्या जनतेची सोय व्हावी यासाठी एस. टी. महामंडळाला विनंती करण्यात आली. शिबिरासाठी रात्रीच्या बसेस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रात्री  साडेतीन ते चार वाजेदरम्यान या बसेस जालन्यात पोहचतील, असे नियोजन होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, शिबिराबरोबरच पतंजली योग पीठ जैविक शेतीवर भर देत असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी भोकरदन येथे 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर 25 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात येणार असून 26 फेब्रुवारी रोजी आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर होईल. 

या शिबिरात बी. पी; मधुमेह, तणावमुक्ती आदींसह अन्य काही रोगांबाबत रामदेव बाबा योगाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत, असेही शेवटी डॉ. आर्य म्हणाले. यावेळी घनशामदास गोयल, रामेश्वर भांदरगे, प्रदीप मानधना, श्रीपत खरात, श्रीराम लाखे, नितीन तावडे, श्रीकिशन डागा, उदय वाणी,  बापू पाडळकर, संदीप महाजन, दिनेश लोहिया, गणेश दराडे, प्रल्हाद हरबक आदी उपस्थित होते.