होमपेज › Jalna › बोंडअळीचे 99 टक्के अनुदान वाटप

बोंडअळीचे 99 टक्के अनुदान वाटप

Published On: Aug 13 2018 1:23AM | Last Updated: Aug 13 2018 1:23AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या 73 कोटी 43 लाख रुपयांच्या अनुदानापैकी 73 कोटी 37 लाख 95 हजारांचे अनुदान 1 लाख 32 हजार 512 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. 99.93 टक्केअनुदानाचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने 2017-18 या वर्षात कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात देण्यसाठी बोंडअळीचे अनुदान जाहीर करण्यात आले. अनुदानासाठी सातबार्‍यावर कापसाचा पेरा आवश्यक होता. ही कागदपत्रे तलाठ्यांमार्फत जमा करण्यात येऊन त्यानंतर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. जालना तालुक्यात 15 हजार 548 शेतकर्‍यांना 8 कोटी 32 लाख 99 हजार 323, बदनापूर 16 हजार 610 शेतकर्‍यांना 6 कोटी 54 लाख 33 हजार 296, भोकदन 34 हजार 549 शेतकर्‍यांना 14 कोटी 6 लाख 12 हजार 633, जाफराबाद 7 हजार 37 शेतकर्‍यांना 5 कोटी 13 लाख 77 हजार 178, परतूर 16 हजार 270 शेतकर्‍यांना 9 कोटी 18 लाख 18 हजार 619, मंठा 7 हजार 983 शेतकर्‍यांना 4 कोटी 31 लाख 60 हजार 452 तर अंबड तालुक्यातील 17 हजार 328 शेतकर्‍यांना 14 कोटी 32 लाख 17, घनसावंगी 17 हजार 187 शेतकर्‍यांना 11 कोटी 53 लाख 98 हजार 482 रुपयांचा निधी प्राप्‍त झाला. या निधीपैकी 99 .93 टक्के निधी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.  

प्रशासन बोंडअळीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याचा दावा करीत असले तरी अनेक शेतकर्‍यांना बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही. गतवर्षीचे अनुदान मिळालेले नसतानाच या वर्षीही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. कपाशीचे महागामोलाचे बियाणे व खते वापररून शेवटी बोंडअळीमुळे हातात काहीच पडणार नसेल तर कपाशीचे पीक घ्यायचे कशासाठी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. वाढती मजुरी व कापसाला भाव नसतानाच आता बोंडअळीमुुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.