Wed, Mar 27, 2019 06:32होमपेज › Jalna › ९७  ग्रामपंचायती होणार ‘पेपरलेस’

९७  ग्रामपंचायती होणार ‘पेपरलेस’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

घनसावंगी : प्रतिनिधी

ग्रामीण जनतेलाही जलदगतीने सुविधा देण्यासाठी आता गावपातळीवरील कारभार ‘पेपरलेस’ होणार असून 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी आपले सरकार योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट’ या नावाने संगणक प्रणाली विकसित करण्यात आल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाइन होणार आहे. यामुळे घनसावंगी तालुक्यात 97 ग्रामपंचायती आता ‘स्मार्ट’ होणार आहेत.

ज्या केंद्रावर इंटरनेट कनेक्टीव्हीटी आहे, तिथे ऑनलाइन, जिथे नाही तिथे ऑफलाइन या दोन्ही स्वरूपात ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीचे मॉडेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेपरलेस प्रणालीत आवश्यक त्या नमुन्यात नोंदी केल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माहितीचे संकलन करून एकत्रित माहिती संकलन करण्यात येणार आहे.

या ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीत केंद्रचालकांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेली माहिती 1 ते 33 संगणकीय नोंदवहीमध्ये नोंद करावयाची आहे. ग्रामपंचायतीच्या मंजुरीनंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने 1 ते 19 सेवा देण्यात येणार आहे. 

ई - ग्रामसॉफ्ट प्रणालीचा फायदा 

मालमत्ता करआकारणी, रहिवासी, वीजजोडणीसाठी ना हरकत, ना हरकत देय प्रमाणपत्र, शौचालय उपलब्धता, बांधकाम अनुमती, जन्म व मृत्यू नोंद, शासकीय योजनांचा लाभ, विवाह नोंदणी, दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती, नोकरी व व्यवसायासाठी ना हरकत, वय, कुटुंब प्रमाणपत्र, वर्तणूक, नळजोडणी अनुमती, बेरोजगार प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार आदी दाखले या प्रणालीतून मिळतील. यासाठी वीस रुपये शुल्क ग्रामस्थाला नियमानुसार द्यावे लागणार आहे. हे दाखले तातडीने दिले जावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.


  •