Sun, Mar 24, 2019 10:31होमपेज › Jalna › योगप्रसारासाठी वेलणकरांचा सहाशे कि.मी. सायकल प्रवास

योगप्रसारासाठी वेलणकरांचा सहाशे कि.मी. सायकल प्रवास

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:50AMजालना : प्रतिनिधी

निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेचे कार्य व योग प्रसारासाठी निरंजन वेलणकर हे 600 किलोमीटर सायकल यात्रेस येत्या 11 तारखेपासून सुरुवात करणार आहेत. परभणी-जालना-औरंगाबाद व बुलडाणा  येथून ते  पुन्हा परभणी असा सायकल प्रवास करणार आहेत.  या प्रवासात ते योग कार्यकर्ते व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. जालना येथे बुधवार 16 रोजी त्यांचे आगमन होणार आहे. 

गतवर्षी सातारा परिसरात योग-ध्यान हा विषय घेऊन वेलणकर यांनी सायकल मोहीम केली होती. त्यानंतर यावर्षी परभणीतून या मोहिमेस 11 मे रोजी सुरुवात करण्यात येणार  आहे. दररोज सकाळी चार ते पाच तास सायकल चालवून दिवसभरात 55 ते 60 किमीचे अंतर ते पार करणार आहेत. परभणी-जिंतूर-नेमगिरी-परतूर-अंबड-औरंगाबाद-जालना-सिंदखेडराजा- देऊळगावराजा-चिखली-मेहकर-लोणार सरोवर-मंठा-मानवत व परभणी असा सुमारे 12 दिवसांमध्ये 600 कि.मी.पेक्षा जास्त सायकल चालविण्याचा त्यांचा संकल्प आहे. योगकार्य विस्तार व योग शिक्षक आणि केंद्र यांना भेटण्याच्या अनुषंगाने हा मार्ग ठरविला गेला आहे. 

चार दशकांपासून निरायम संस्था कार्य करते आहे. योग साधना व योग शिकविण्याबरोबरच संशोधन, योग परिषदामध्ये सहभाग, प्रसार अशी कामे संस्थेमार्फत होत आहेत. निरंजन वेलणकर यांचे परभणी हे मूळ गाव आहे. या चार जिल्ह्यांमध्ये योग प्रसार करण्याच्या अनुषंगाने त्यांनी ही सायकल मोहीम हाती घेतली आहे.

जिल्ह्यात असा असेल प्रवास 

शनिवार 12 मे रोजी  वेलणकर परतूरमध्ये येणार असून 13 मेला ते अंबडमधील कार्यकर्त्यांची भेट घेतील. त्यानंतर ते औरंगाबादकडे जाणार असून  बुधवार 16 मे रोजी ते जालना शहरात येऊन योग्य प्रसाराचे कार्य करतील. चैतन्य योग केंद्र त्यांची जालन्यातील व्यवस्था पाहत आहेत.येथून वेलणकर हे पुढच्या प्रवासाला सिंदखेडराजाकडे जातील.