होमपेज › Jalna › 59 हजार शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका

59 हजार शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 10:36PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आतापर्यंत 407 कोटी 77 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. या रकमेमुळे 59 हजार 697 शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी झाला. परिणामी हे सर्व शेतकरी नव्या कर्जासाठी पात्र झाले असून त्यापैकी 26 हजार 268 शेतकर्‍यांना या वर्षी 234 कोटी 23 लाख रुपयांचे कर्जही देण्यात आले आहे. 

जिल्ह्यात एकूण 1 लाख 32 हजार 412 शेतकरी आहेत. दरम्यानच्या काळात सरकारी नोकर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध मंडळे व महामंडळांचे सदस्य, कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकरी, विशिष्ट काळाच्या आधीचे थकबाकीदार आदी वर्गवारी घोषित करून संबंधितांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे कळवण्यात आले. त्यामुळे ऑनलाइन अर्जदारांची विभागणी करून त्यातील पात्र व अपात्र अशा स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या. या यादीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 1 हजार 612 शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्‍कम वळती झाल्याचे यत्रंणेने स्पष्ट केले असून ही रक्‍कम 593 कोटी 69 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान छाननी आणि रक्‍कम वळती करण्याचे काम अद्यापही सुरू असल्याने उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदत रकमेच्या (कर्जमाफीची दीड लाखाची रक्‍कम) व्यतिरिक्‍तची कर्ज रक्‍कम संबंधितांना एकरकमी भरावी लागते; परंतु असे करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे बहुतेक जण सदर योजनेपासून वंचित आहेत. दरम्यान सरकारच्या ताज्या निर्णयामुळे आता त्यांनाही लाभ घेता येणार आहे.